
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे ह्या गावातील आतकरी कुटुंबाने आगरी समाज आणि इगतपुरी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ह्या कुटुंबात आधीच डॉक्टर असलेले वडील समाजाची सेवा करीत आहेत. आता त्यांची २ मुलेही आता डॉक्टर झाली असून मुलांच्या आईचा सुद्धा हॉस्पिटल मॅनेजमेंटचा डिप्लोमा झाला आहे. डॉक्टर होऊन समाजाची निरपेक्ष सेवा करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आतकरी कुटुंबाच्या यशाने इगतपुरी तालुक्यासह आगरी समाजाची मान उंचावली आहे. हे कुटुंब सध्या पुणे येथे शिक्षणानिमित्त वास्तव्याला असून पुणे जिल्ह्यातही त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. समाजाच्या गरीब वर्गाला उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी बांधील असल्याचे दोन्ही नव्या डॉक्टरांनी सांगितले. आतकरी परिवाराने मिळवलेले यश त्यांच्या परिश्रमाचे फळ आहे. त्यांच्या यशामुळे मोठा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया बोरटेंभे येथील गावकऱ्यांनी दिली. राष्ट्रवादीचे इगतपुरी तालुका कार्याध्यक्ष मदन कडू आणि संपूर्ण कडू परिवाराकडून आनंद व्यक्त करून अभिनंदन करण्यात आले.
डॉ. सुरेश बबन आतकरी यांचे DHMS ( मुंबई ), BHMS ( पुणे ), MD (MUHS नाशिक ) असे शिक्षण झाले असून गरीब परिस्थितीवर मात करून त्यांनी हे यश संपादन केलेले आहे. समाजाची सेवा करण्यासाठी त्यांनी स्वतः डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. विद्या सुरेश आतकरी यांनीही हॉस्पिटल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केलेला आहे. आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाकडे प्राधान्याने लक्ष देत आतकरी दांपत्याने दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. आता या कुटुंबात २ डॉक्टरांची भर पडली आहे. पहिला मुलगा डॉ. अथर्व सुरेश आतकरी हा MBBS झाला आहे. दुसरा मुलगा डॉ. वेदांत सुरेश आतकरी यानेही BHMS मधून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. सामान्य परिस्थितीमधून पुढे गेलेल्या ह्या कुटुंबात ३ डॉक्टर झाले असल्याची ही घटना इगतपुरी तालुक्यात अतिशय दुर्मिळ आहे. यामुळे समाजाची आणि तालुक्याची शान वाढली आहे. दोन्ही मुलाच्या या यशाने डॉ. सुरेश आणि सौ. विद्या आतकरी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मुलांचे अभिनंदन करताना आपले आनंदाश्रू त्यांना आवरता आले नाहीत.