
इगतपुरीनामा न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध दोन वर्षे लैंगिक अत्याचार करणार्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी सुशांत बच्चू पाराडे ( वय 30, रा. इगतपुरी, जि. नाशिक) आणि तिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. नंतर त्यांच्यात मैत्री वाढत गेली. कालांतराने मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपी पाराडे याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखविले. 9 ऑगस्ट 2022 ते दि. 12 मार्च 2024 या कालावधीत आरोपी सुशांत पाराडे याने पीडितेचा विश्वास संपादन करून तिला त्र्यंबकेश्वर येथील वृंदावन लॉन्स व मुक्तिधामच्या पाठीमागे असलेल्या नटराज लॉज येथे नेऊन वेळोवेळी पीडितेच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर अत्याचार केले. विशेष म्हणजे तो आधीच विवाहित होता. मात्र, त्याने ही गोष्ट पीडितेपासून लपवली होती. पीडितेने लग्नाबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तो फसवत असल्याची जाणीव होताच तिने पोलीस ठाणे गाठत आपबिती सांगितली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आरोपी सुशांत पाराडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.