इगतपुरीनामा न्यूज – हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव, जनसेवेच्या कामाचा छंद, आणि सामाजिक कार्यात तन मन धनाने काम करण्याची प्रवृत्ती ह्या तीन सूत्रांवर इगतपुरी तालुक्यात काम उभे करणारे हाडाचे शिवसैनिक मोहन रामजी बऱ्हे यांची शिवसेना ( शिंदे गट ) उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. बाल शिवसेना शाखाप्रमुख ते उपजिल्हाप्रमुख हा उत्तुंग प्रवास अनुभवणाऱ्या मोहन बऱ्हे यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने ह्या निवडीमुळे न्याय मिळाला आहे. गावागावातच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभर जनसंपर्कात आघाडीवर असणाऱ्या ह्या शिवसैनिकाला स्वतःच्या ताकदीने काम करण्यासाठी शिवसेनेने मोठी संधी निर्माण करून दिलेली आहे. त्यांच्या सोबतच विविध पदांवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आगामी विधानसभा निवडणूक जिंकवून देण्याचा त्यांचा ध्यास आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी बालपणी त्यांना प्रेरित केले. अधरवड ता. इगतपुरी ह्या आपल्या जन्मगावातच बाल शिवसेना शाखा प्रमुख म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला आरंभ केला. संपूर्ण टाकेद जिल्हा परिषद गटातील घराघरात त्यावेळी त्यांचे काम पोहोचले. हळूहळू तालुकाभर त्यांना नावलौकिक लाभला. नंतर शिवसेना शाखाप्रमुख म्हणून सुरु झालेला प्रवास विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख, युवासेना तालुका प्रमुख, शिवसेना इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा निरीक्षक ह्या जबाबदारी असणाऱ्या पदापर्यंत घेऊन गेला. मधल्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी अनेकांना विजयी करण्यात मोठा हातभार लावला. आरक्षणामुळे मोहन बऱ्हे यांना जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी करता आली नाही. भविष्यात अनुकूल आरक्षण मिळाल्यास निश्चितच त्यांचा प्रवास जिल्हा परिषदेत होणार आहे. शिवसेना शिंदे गटाने त्यांची क्षमता ओळखून त्यांच्यावर उपजिल्हाप्रमुख पदाची सोपवलेली जबाबदारी तंतोतंत पार पाडतील. त्यांच्या कौशल्यदायी अनुभवाचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला झाल्याशिवाय राहणार नाही.