इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
इगतपुरी तालुका ग्रामपंचायत संघर्ष समिती नेहमीच उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. ह्यानुसार सातत्याने संघर्ष करून सामाजिक न्याय मिळवून चांगली कामे करून घेतली आहेत. मात्र असे असतांना बऱ्याच लोकांकडून सामाजिक न्यायाला हरताळ फासला जातो. हे थांबावे यासाठी संघटनेने थेट राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांची भेट घेतली. संघटनेने उपस्थित केलेल्या मुद्यांवर प्राधान्याने लक्ष घालून कामे मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन ना. धनंजय मुंढे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
मंत्री महोदयांना संघटनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र दोंदे यांनी चर्चेवेळी सांगितले की, इगतपुरी तालुक्यात अनुसूचित जाती, नवबौध्द घटकांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात समाज कल्याण विभागामार्फत निधी मंजूर झालेला आहे. मात्र ही विकासकामे बृहत आराखड्यानुसार होत नाहीत. ही कामे आराखड्याबाहेरील अनाधिकृत कामे करुन भ्रष्ट्राचाराचे कुरण बनत आहे. काही लोकप्रतिनिधीच्या सहाय्याने भ्रष्ट लोकसेवक निधी लाटण्याचे काम करण्याच्या तयारीत दिसत असतात. हे रोखण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने शासन दरबारी पत्रव्यवहार केला. परंतु स्थानिक प्रशासन राजकीय दबावाखाली कोणतेही ठोस निर्णय घेत नाही. म्हणुन संघटनेच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
बृहत आराखड्यानुसारच सर्व विकासकामे करुन निधीचा गैरवापर थांबवुन आम्हाला न्याय देण्यात यावा असे साकडे यावेळी घालण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेनुसार मंत्री महोदयांनी प्राधान्याने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र दोंदे, योगेश भरीत, राहुल जगताप, आत्माराम उघडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.