इगतपुरीनामा न्यूज – १ जानेवारीला मध्यरात्रीचे सुमारास घोटी पोलीस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर मुंढेगाव शिवारात फिर्यादी किरण कावळे, रा. दिवा ईस्ट, ठाणे हे त्यांचे मित्रांसोबत होंडा सिटी कारमध्ये नाशिक बाजूकडे रस्त्यावर रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी थांबलेले होते. यावेळी मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात तीन आरोपींनी त्यांच्या कारची पुढील काच फोडून, लोखंडी कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करून त्यांच्या सोन्याच्या चैन, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण ७० हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जबरीने लुटमार करून नेला होता. ह्याबाबत घोटीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ह्या घटनेनंतर १३ जानेवारीला अशाप्रकारे तीन आरोपींनी मोपेड मोटर सायकलवर येवून फिर्यादी नवीनकुमार जैन, रा. दादर, मुंबई यांचे टाटा हॅरिअर कारच्या काचा फोडून, कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल फोन असा ८२ हजार किंमतीचा मुद्देमाल जबरीने लुटमार करून नेल्याबाबत वाडीवऱ्हे येथे गुन्हा दाखल होता. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अनिकेत भारती यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाणेनिहाय नाउघड गुन्ह्यांचा आढावा घेवून गुन्हे उघडकीस आणणेसाठी पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या पथकाने वरील गुन्ह्यातील आरोपीतांची गुन्हा करण्याची पध्दत व त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटर सायकल यावरून तपासाची चक्रे फिरवून गुन्हेगार हे नाशिक शहरातीलच असल्याचे निश्चित केले.
पोलीस पथकाने नाशिक शहरातील नानावली, द्वारका, उपनगर परिसरात सतत पाळत ठेवून सराईत गुन्हेगार तौसिफ लुकमान पठाण उर्फ गफुर बस्ती, वय ३०, रा. घर नं. ३८८२, नानावली, मानुर रोड, नाशिक, प्रविण उर्फ चाफा निंबाजी काळे, वय २४, रा. आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॉल रोड, उपनगर, नाशिक यांना शिताफीने ताब्यात घेतले. ह्या आरोपींना विश्वासात घेवून गुन्ह्यांबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचा साथीदार मोहम्मद अन्वर सैय्यद, रा. स्वामी समर्थ हौसिंग सोसायटी, नानावली, प्रज्ञानगर नाशिक याच्यासह मागील महिन्यात मोटर सायकलवर घोटी, वाडीवऱ्हे परिसरात जावून रस्त्यावर थांबलेल्या वाहनांमधील प्रवाशांना कोयत्याचा धाक दाखवून गाडीच्या काचा फोडून मारहाण करून जबरीने लुटमार केल्याची कबुली दिली. यातील ताब्यात घेतलेले आरोपी तौसिफ पठाण व प्रविण काळे यांचे कब्जातून वरील गुन्ह्यांमध्ये जबरीने चोरून नेलेले, कब्जात मिळून आलेले व्हीवो ओपो, रिअलमी, रेडमी, अँलप, टेक्नो कंपनीचे ९ मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली निळी होन्डा ॲक्टीव्हा मोटर सायकल, पिवळ्या धातूची चैन असा एकुण ९७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ह्या गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद अन्वर सैय्यद हा भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत अग्निशस्त्रे बाळगल्याचे गुन्हयामध्ये मध्यवर्ती कारागृह, नाशिकरोड येथे न्यायालयीन कोठडीत आहे. यातील सर्व आरोपी हे नाशिक शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचेवर यापुर्वी जबरी चोरी, चोरी, दुखापत, आर्म ऍक्ट असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यांचे तपासात ह्या आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोहवा नवनाथ सानप, विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, मनोज सानप, भुषण रानडे यांचे पथकाने वरील जबरी चोरीचे २ गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे.