लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – वरई, नागलीचे लाडू, चिक्की, भगर, रानातले मध, निरगुडीचे गुणकारी तेल, हातसडीचे तांदूळ नाशिकच्या कृषी महोत्सवात सर्वांचे आकर्षण ठरत आहे. महाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा नाशिक व महिला विकास महामंडळ ( माविम ) नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतिगृह मैदान गंगापूर रोड नाशिक येथे आजपासून १४ फेब्रुवारी पर्यंत कृषी महोत्सव सुरु आहे. यामध्ये इगतपुरी हा नैसर्गिक साधन संपत्तीचे भरभरून वरदान लाभलेल्या तालुक्यातुन आदिवासी महिला शेतकऱ्यांनी स्टॉल लावला आहे. अतिशय खडतर आणि अतिदुर्गम असणाऱ्या कुरुंगवाडी येथील दारणामाई महिला बचत गट केंद्राच्या महिलांच्या स्टॉलला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. कृषी महोत्सवात प्रवेश विनामूल्य असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी या महोत्सवात सहभाग घ्यावा असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ यांनी आदिवासी महिला बचत गट निर्मित वस्तूंचा आस्वाद घेऊन इगतपुरी कृषी विभागाचे कौतुक केले.
इगतपुरी तालुका कृषी विभागामार्फत आदिवासी महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या विकेल ते पिकेल धोरणांतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र महोत्सवात सुरु आहे. इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांच्या संकल्पनेतून कुरुंगवाडी येथील महिला शेतकऱ्यांनी तयार केलेली उत्पादने चवदार वरई लाडू, वरई चिक्की, भगर, नागली लाडू, गावरान तूप, रानातले मध, हातसडी तांदूळ ग्राहकांची पसंती ठरला आहे. उत्पादक शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग, किरकोळ विक्री साखळ्या आणि कृषी आधारित उद्योगांच्या माध्यमातून नवीन व संघटित बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध असल्याचे मंडळ कृषी अधिकारी मनोज रोंगटे यावेळी म्हणाले. केंद्रामध्ये ग्राहकांनी तुडूंब गर्दी करत खरेदीला जोरदार प्रतिसाद देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल उंचावून अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकरी गट यांनी बाजारपेठेत मागणी असलेल्या उत्पादनाची थेट विक्री करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी केले. अनेक मान्यवरांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनाची चव चाखत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.