
इगतपुरीनामा न्यूज – शासनाने कोट्यवधीचा निधी पाण्यासाठी दिला असूनही स्थानिक प्रशासनाकडून हा निधी लाटण्यात येत आहे. खोदलेल्या विहिरीत थेंबभरही पाणी नसल्याने ही योजना आपल्या ताब्यात घेण्यासाठी ग्रामपंचायतीचा सपशेल नकार आहे. हा प्रकार इगतपुरी तालुक्यातील शिरसाठेमध्ये घडला आहे. गावाकडे २ वर्षांपूर्वी जलजीवन अंतर्गत दीड कोटीचा निधी प्राप्त आहे. मात्र पाईप किंवा कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत. खोदलेल्या विहिरीला पाण्याचा स्रोत नाही. म्हणून येथील नागरिक पाण्यापासून वंचित आहे. ह्या वादग्रस्त कामाची तातडीने चौकशी करावी अशी मागणी डॉ. दत्ता सदगीर, माजी उपसरपंच राजाराम बोडके यांनी केली आहे. अंदाजपत्रक करून ठेकेदार, शाखा अभियंता व उपअभियंता यांच्या संगनमताने योजनेला मंजुऱ्या मिळालेल्या आहे. योजनेनुसार धरणाच्या बाजूला खोदलेल्या विहिरीला पाणी असूनही ही विहीर उन्हाळ्यात कोरडी पडते. म्हणून गावाला मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या उद्भवत आहे. मनमानी कारभारामुळे योजनेचे काम सुरु असल्यामुळे माजी उपसरपंच राजाराम बोडके व डॉ. दत्ता सदगीर यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. भुजल खात्याने पाणी असल्याचे दाखले दिले कसे हा प्रश्न उपस्थित होत आहे. नियमानुसार पाणी लागलेल्या विहिरीच्या योजनेचे बिल काढता येते. इगतपुरी तालुक्यात योजना पूर्ण झाल्याचे दाखवून एजन्सी मार्फत बिले काढण्याचा प्रकार घडत आहे. अधिकाऱ्यांवर राजकीय वरदहस्त असून राष्ट्रीय जलजीवन मिशन योजनेची चौकशी व्हावी. सबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी शिरसाठेच्या सरपंच सुनीता दत्ता सदगीर यांनी केली आहे.