इगतपुरीनामा न्यूज – गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांची उपयुक्तता महत्वाची आहे. या प्रक्रियेमध्ये महिलांना सक्रिय सहभागी करून पाणी वापराचे नियोजन केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. ह्यादृष्टीने टिटोलीचे माजी सरपंच अनिल भोपे यांनी टिटोली गावच्या सर्व महिलांसाठी आदर्श ग्रामपंचायत पाटोदा येथे स्वखर्चातून अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. पाटोदाच्या सरपंच जयश्री दिवेकर यांनी महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. ह्या मार्गदर्शनामुळे गावाचा कायापालट करण्याची शक्ती मिळाली असे महिलांनी सांगितले. ह्या अभ्यास दौऱ्यातून टिटोलीच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. गावाच्या मूलभूत प्रश्नांवर योग्य दिशादर्शक तोडगा निघेल असा विश्वास अनिल भोपे यांनी व्यक्त केला. ह्या उपक्रमाचे इगतपुरी तालुक्यात कौतुक केले जात आहे.
पावसाच्या प्रत्येक थेंबाला आपण आपल्या प्रगतीशी जोडायची आवश्यकता आहे. स्त्रोताची पर्वा न करता पाण्याचा वारेमाप वापर होत असल्याने परिस्थिती बिकट होत आहे. वाचवलेल्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करण्यासाठी जागरूकतेने घराघरांतून पाणी वापराचे नियोजन आवश्यक आहे. नियोजन नसल्याने पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे चित्र आहे. व्यवस्थापनातील त्रुटी, गैरवापर हे याचे महत्त्वाचे कारण आहे. पाणी पुरवठा व पाणी वापराच्या पद्धतींची माहिती घेणे गरजेचे आहे. पाण्याची शुद्धतेचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो. म्हणून या विषयावर महिलांनी कंबर कसून भर दिल्यास प्रश्न कायमचा सुटू शकतो. अशा विविध विषयांवर महिलांनी सरपंच जयश्री दिवेकर यांच्याकडून माहिती घेतली. विचारांची देवाणघेवाण घडवून गावाला पुढे नेण्यासाठी हा दौरा आयोजित करणारे माजी सरपंच अनिल भोपे ह्यांचे महिलांनी आभार मानले.