सामान्य इगतपुरीकरांचे “सिंघम” पोलीस अधिकारी राजू सुर्वे :  कर्तव्य दक्षतेमुळे गुन्हेगारी रोखण्यात यश ; अनेक गुन्हे आणले उघडकीस

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई क्राईम ब्रॅंचमध्ये उल्लेखनीय काम करून इगतपुरीत पोलीस निरीक्षक म्हणून राजू सुर्वे १० मार्चपासून रुजू झाले. तेंव्हापासून त्यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली होईपर्यंत त्यांनी इगतपुरी पोलीस ठाणे हद्धीत आपल्या कामगिरीने पोलीस खात्याची शान वाढवली. जनमाणसात वेगळी प्रतिमा निर्माण करून गुन्हेगारांवर वचक निर्माण केला. त्यांच्या बदलीमुळे सर्वसामान्य इगतपुरीकर नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत. इगतपुरीकरांचा सिंघम म्हणून ओळख असलेले पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या कौशल्यदायी कामगिरीमुळे कायद्याचे राज्य निर्माण झाले. सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सामान्य नागरिकांना राजू सुर्वे यांच्या बदलीमुळे दुःख झाले. असे असले तरी इगतपुरीकरांसाठी त्यांनी उभा केलेला कार्याचा वसा आगामी काळात निश्चित जपला जाणार आहे. शासकीय कामात बदली ही अनिवार्य घटना आहे. इगतपुरीच्या नागरिकांमुळे चांगले काम करता आले. यापुढेही अधिकाधिक चांगले काम करू असे राजू सुर्वे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी केलेल्या कार्याचा आढावा इगतपुरीच्या नागरिकांनी घेतला. श्री. सुर्वे साहेबांनी सर्वात प्रथम मागील १ वर्षापेक्षा जास्त काळ खुनाच्या गुन्ह्यात वाँटेड असलेले आणि इगतपुरीत दहशत असलेले डेव्हिड गॅंगच्या तीन संशयित आरोपीचा कसोशीने शोध घेऊन विक्रोळी मुंबई व औरंगाबाद येथून ताब्यात घेतले. नांदगाव सदो येथील भंडारी गँगचा हप्ता गोळा करण्यासाठी आलेला सूरज भंडारी यास रंगेहाथ अटक केली. भंडारी गॅंगचा पुरुषोत्तम गिरी उर्फ गग्या याला सुद्धा रॉबरीच्या गुन्ह्यात अटक केली. केपीजी कॉलेजसमोर निर्जन ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधारात विश्रांतीसाठी महामार्गांवर थांबणाऱ्या ट्रक चालकाला लुटून वारंवार गुन्हे करणारी टोळी गजाआड केली. त्यामुळे हाय वे वरील जबरी चोऱ्या पूर्णपणे थांबल्या आहेत. सव्वा कोटी किमतीचा प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारे दोन कंटेनर जप्त केले. घाटनदेवी उंटदरी येथे एका युवकाचा जमावाने केलेल्या खुनप्रकरणी १३ संशयित आरोपीना अटक करुन त्यांचेविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

घोटी येथील खुनाच्या गुन्ह्यातील चार संशयित आरोपींना पकडून घोटी पोलिसांच्या स्वाधीन केले. वाडीवऱ्हे येथील फायरिंगच्या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपीना पकडून वाडीवऱ्हे पोलिसांच्या स्वाधीन केले. एकाच रात्रीत इगतपुरी शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी टाळा तोडून मंदिरातील दानपेटीतील रोख रक्कम व पूजेचे पितळी समई व भांडी चोरी केलेल्या चोरट्यास अवघ्या १२ तासात  बेड्या ठोकून गुन्ह्यातील चोरीस गेलेली सर्व मालमत्ता हस्तगत केली. पिंप्री सदो येथे झालेला खुनाचा गुन्हा २४ तासात उघडकीस आणून चार जणांना हत्यारासह अटक केली. कुख्यात गँगस्टर कवू उर्फ फ्रान्सिस पॅट्रीक मॅनवेल यास खंडणीच्या गुन्ह्यात अटक करून इगतपुरीतील कुविख्यात डेव्हिड गँगच्या गुन्हेगारी कारवाया संपुष्टात आणल्या. भावली येथील आदिवासी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवतो असे सांगून समाजसेवक असल्याचे भासवून खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगारा विरोधात कारवाई केली. घाटनदेवी यात्रेत दरोडा टाकण्यास आलेल्या पाच सराईत गुन्हेगारांच्या हत्यारांनीशी मुसक्या आवळल्या. घोटी येथील सध्या खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेला संशयित आरोपीला मागील ४ महिन्यापूर्वी दोन अग्नी शस्रासह अटक केली. महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या २ सराईत गुन्हेगारांना सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली. इगतपुरी येथे रेल्वे रुळावर मिळून आलेल्या बेवारस मृतदेहाबाबत चौकशी करून मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या इसमाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करुन कायदेशीर कारवाई केली. एवढ्या अल्प कालावधीत अनेक गुन्हे इगतपुरी पोलीसांनी उघडकीस आणले. त्यामुळे गुन्ह्यांना आळा आणि गुन्हेगारांवर वचक बसला आहे. इगतपुरी वासीयांमध्ये पोलीसप्रती चांगली भावना दृढ झाली असून सर्वसामान्य जनतेमध्ये पोलिसांवरचा विश्वास वाढून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. पिंप्री सदो उरुस व घाटनदेवी नवरात्रोत्सवात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही गुन्हा, महिलांची छेडछाड, पाकीटमारी, मोबाईल चोरी, मारामारी, दादागिरी, भांडण तंटा या सारखी कोणतीही अनुचित घटना घडली नाही. इगतपुरीकर पोलिसांच्या दक्षतेवर आणि कार्यावर मनापासून समाधानी झालेले आहेत. राजू सुर्वे साहेबांना सामान्य इगतपुरीकर नागरिकांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Similar Posts

error: Content is protected !!