इगतपुरीनामा न्यूज – महामार्गावरील टोल टॅक्स फास्टॅगद्वारेच कापला जातो. टोल रोखीने भरल्यास दुप्पट रक्कम आकारली जाते. यामुळेच आता बहुतांश वाहनचालक फास्टॅग वापरतात. कोणत्याही टोल बूथवरून कारने न जाताही टोल टॅक्स कापला जात असल्याच्या घटना ऐकण्यात येत असतात. इगतपुरी तालुक्यातील पत्रकार भास्कर सोनवणे यांच्या नाशिकच्या घराबाहेर उभ्या असलेल्या अल्टो कारचा टोलही त्यांच्या घरापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदवड येथील टोल प्लाझावर फास्टॅगद्वारे कापण्यात आला. याबाबत भास्कर सोनवणे यांनी १०३३ आणि फास्टॅग हेल्पलाईनकडे तक्रार केली आहे. याबाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही तक्रार करण्यात येणार आहे. चांदवड टोलप्लाझाच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे घरी उभ्या असलेल्या आपल्या MH 15 FN 0558 ह्या अल्टो वाहनाचा १६५ रुपये टोल टॅक्स कापण्याची घटना झाल्याचे भास्कर सोनवणे यांना एसएमएसद्वारे समजले. त्यांनी लगेचच आयडीएफसी हेल्पलाईनकडे तक्रार केली. मात्र चांदवड टोल प्लाझाने ही तक्रार एकतर्फी निकाली काढून हेच वाहन टोलप्लाझाहुन गेल्याने टोल कापल्याचे मुजोर उत्तर दिले आहे. श्री. सोनवणे यांनी पुन्हा तक्रार करून माझे घरी असलेले वाहन टोलप्लाझावर आले नसूनही प्रकरण दडपण्यासाठी चांदवड टोलप्लाझा तक्रार फेटाळत असल्याचे म्हटले आहे. माझे वाहन चांदवड टोलप्लाझाहुन गेले असल्याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासून ते फुटेज पाहायला मिळावे अशी मागणी केली आहे. त्यांचे वाहन घरीच उभे असल्याबाबत सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. याबाबत पूर्तता न झाल्यास चांदवड टोल प्लाझाला धडा शिकवण्यासाठी थेट न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे भास्कर सोनवणे यांनी सांगितले. टोल नाक्यावरून न जाताही वाहनाच्या फास्टॅगमधून टोल टॅक्स कापल्यास प्रत्येक व्यक्तीला पैसे परत मिळण्याचा अधिकार आहे. यासाठी सर्वांगीण पाठपुरावा करण्यात येणार आहे.