
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा साधू, संत, महंत महामंडलेश्वर जगदगुरु आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्यात जगद्गुरू द्वाराचार्य म्हणून वारकरी संप्रदायाचे उपासक संत तुकाराम महाराज अध्यासन पुणे विद्यापीठ माजी प्रमुख व प्राध्यापक लेखक महामंडलेश्वर श्री महंत विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांना रामजन्मभूमी न्यास अयोध्या यांनी विशेष निमंत्रित केले आहे. श्री. लहवितकर महाराज १९ जानेवारीला अयोध्येत जाणार असून त्यांचा विद्यार्थी तुकाराम शिंदे देखील त्यांच्या सोबत समारंभात सहभागी होणार आहे. इतर नागरिकांपैकी सर्वच अयोध्येत येऊ शकत नाही मात्र आपल्या गावातील राम मंदिरात, हनुमान मंदिरात आनंद साजरा करू शकतात. अभिषेक, पूजा, विद्युत रोषणाई सजावट आदी करावी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम राष्ट्राची अस्मिता असून ते शक्तिमान आहेत. आरोग्य, ऐश्वर्य, राष्ट्राची अस्मिता स्थिर राहण्यासाठी सहभाग नोंदवावा. महाराष्ट्रातील तमाम वारकरी अनुवर्ती मंडळीनी रामजन्म भूमीच्या उत्सवानिमित्त आनंदोत्सव साजरा करावा असे आवाहन जगदगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांनी केले आहे.