अभिमानास्पद – घोटीच्या मातोश्री हॉस्पिटलने २२ वर्षीय युवतीला मृत्यूच्या जबड्यातून काढले बाहेर : साक्षात मृत्यूसुद्धा रुग्णाच्या विश्वासामुळे झाला पराजित

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या एका २२ वर्षीय आदिवासी युवतीला मृत्यूच्या जबड्यातून घोटी येथील मातोश्री हॉस्पिटलने परत आणले आहे. मुंबई, नाशिकच्या नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या प्रकरणात हतबलता व्यक्त करून मोठ्या धोक्याची सूचना दिली होती. मात्र युवतीच्या नातेवाईकांचा मातोश्री हॉस्पिटलवरील पक्का विश्वास आणि सुयोग्य व्यवस्थापन यामुळे ह्या युवतीचा पुनर्जन्म झाला आहे. संबंधित आदिवासी कुटुंबाने मातोश्री हॉस्पिटल आणि ह्या शस्त्रक्रियेसाठी आपले कौशल्य पणाला लावणाऱ्या सर्वांना अश्रूचे पाट वाहत कृतज्ञता व्यक्त केली. इगतपुरी सारख्या आदिवासी दुर्गम तालुक्यात नेहमीच रुग्णांसाठी तत्पर असणाऱ्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये दुर्धर शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. आदिवासी भागातील हक्काचे रुग्णालय म्हणून ते सुप्रसिद्ध असून ह्या प्रकरणाच्या यशाबद्धल जिल्हाभरातून मातोश्री हॉस्पिटलचे कौतुक केले जात आहे. २२ वर्षीय भावी अधिकारी आदिवासी युवतीला घोटी घोटी येथील मातोश्री हॉस्पिटलने पुनर्जन्म मिळवून दिला. तिला जीवनदान देण्यात रुग्णाचा आमच्यावरील विश्वासाचा मोठा वाटा आहे. या संपूर्ण युद्धात लॅब तंत्रज्ञ श्री. मुंगसे, सिद्धी मेडिकलचे संचालक कुमार चोरडिया यांनी मोलाची भूमिका पार पाडली. मातोश्री हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. हेमलता चोरडिया स्वतः रात्री ३ वाजेपर्यंत रुग्ण युवतीकडे लक्ष देऊन तिचे मनोधैर्य उंचावले. सर्व नर्सिंग, डॉक्टर, स्टाफ यांनी सुद्धा महत्वाची भूमिका बजावली असे डॉ. जितेंद्र चोरडिया यांनी सांगितले.

२२ वर्षीय आदिवासी युवती पोटदुखी, अंगावरून रक्त जाणे, चक्कर, हातपाय दुखणे ह्या कारणामुळे मातोश्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. यापूर्वी काढलेल्या तिच्या सोनोग्राफी, रक्त तपासणी अहवालानुसार पोटात एक दीड लिटर रक्त साठले होते. चुकीच्या जागी गर्भधारणा किंवा इतर कारणांनी रक्तश्राव झाल्याचे निदान संबंधित डॉक्टरांनी केले होते. प्लेटलेट्स ४९ हजार असल्याने शहापूर येथील डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया न करता तिला तात्काळ मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. मात्र रुग्ण युवती आणि जवळच्या नातेवाईकांचा घोटीच्या मातोश्री हॉस्पिटलवर पूर्ण विश्वास असल्याने तिला मातोश्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी तिच्या नाडीची गती १२० ते १३० आणि रक्तदाब ९०/६० पर्यंत पोहोचला होता. जीवन मरणाची लढाई करीत असलेल्या ह्या तरुणीला प्रचंड थकवा, अस्वस्थता वाटत होती. डॉ. धनंजय चव्हाण यांनी तिचा आरोग्य इतिहास आणि तफावत असलेला सोनोग्राफी अहवाल तपासून पुन्हा सोनोग्राफी, रक्ततपासणीचा निर्णय घेतला. आलेले अहवाल पाहता अतिशय धक्कादायक असे अहवाल दिसून आले. प्लेटलेट्स अवघे २७ हजार आणि हिमोग्लोबिन ८.६ पर्यंत कोसळले होते. माणसाच्या शरीरात प्लेटलेट्सचे प्रमाण कमी झाल्यास अनेक आजारांना सामोरे जावे लागते. ह्या रक्तपेशी रक्तस्त्राव थांबवण्यास सहाय्यक ठरत असतात. दुखापत झाल्यास अतिरिक्त रक्त बाहेर येण्यापासून रोखण्यासाठी प्लेटलेट्स शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार करण्याचे कार्य करतात. ह्याच प्लेटलेट्स अत्यंत कमी असल्यामुळे रुग्ण युवतीला नाशिकला दाखल करावे असे सांगण्यात आले. मातोश्री हॉस्पिटल वरील दृढ विश्वासामूळे नातेवाईकांनी जे उपचार करायचे ते तुम्हीच करा. पण आम्हाला दुसरीकडे पाठवू नका. तुम्ही योग्य उपचार, योग्य निर्णय घ्याल. आम्ही याबाबत आपल्याला अधिकार देतो. म्हणून आम्हाला दुसरीकडे पाठवू नका अशी कळकळीची विनंती केली. हॉस्पिटलने पुन्हा पुन्हा नाशिकला सुसज्ज रुग्णालयात जावे असे सांगूनही नातेवाईकांच्या आग्रहामुळे मातोश्रीमध्ये उपचार करण्याचे ठरवण्यात आले.

युवतीवर शस्त्रक्रिया करावीच लागणार असली तरी अनेक मोठ्या समस्या निर्माण झाल्या. शस्त्रक्रिया कधी करायची? लगेचच केली तर २७ हजार प्लेटलेट्समुळे रक्तश्राव वाढणार होता. त्यामुळे दोन तीन तासात १० हजारापेक्षा प्लेटलेट्स कमी होणार होत्या. ह्या अवस्थेत कोण शस्त्रक्रिया करणार? कोण भूल देणार? यावेळी पूर्ण वेळ रुग्ण सेवेला वाहून घेतलेले आणि दीर्घ अनुभव असणारे डॉ. प्रदीप इंगोले यांचे याबाबत सखोल मार्गदर्शन घेण्यात आले. ही शस्त्रक्रिया दुर्बीणीद्वारे केल्यास कमीतकमी रक्तश्राव होऊन रुग्ण युवतीला जीवदान देण्याचा प्रयत्न करता येईल असे त्यांनी सांगितले. भूल देण्यासाठी डॉ. प्रदीप इंगोले तयार होतेच. आणीबाणी सदृश्य स्थितीत मातोश्री हॉस्पिटलवर विश्वास दाखवत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अभिषेक कोठुळे यांनी याबाबत उपचार सुरु केले. उपचार आणि शस्त्रक्रियेच्या मापदंडाच्या पलीकडे असणारे हे प्रकरण सर्वांची द्विधा अवस्था करणारे होते. रुग्ण युवती आणि नातेवाईकांना संभाव्य सगळे धोके समजावून सांगत मृत्यूच्या दाढेतून युवतीला बाहेर काढण्यासाठी मंजुरी घेतली गेली. डॉ. ज्ञानेश्वर शिरसाठ यांनी महत्वाच्या सूचना दिल्या. जास्त रक्तपिशव्या, शस्त्रक्रिये दरम्यानच्या संभाव्य गुंतागुंती, सुसज्ज पूर्वतयारी याचा सखोल विचार करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्धार करण्यात आला. अखेर रात्री सव्वा अकराला सुरु झालेली ही मोठी लढाई तब्बल ४० मिनिटे चालली. विशेष म्हणजे अतिशय सूक्ष्म नियोजनाने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे समजताच सर्वांनी एकच जल्लोष केला.

Similar Posts

error: Content is protected !!