सलगच्या अवकाळीने इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान : सरसकट विमा मंजूर करून नुकसान भरपाई द्या – इंदिरा काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात सलग दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने शेतात कापणी केलेल्या भाताचे व बागायती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भिजलेल्या भाताला मोड फुटण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनस्तरावर याची दखल घेऊन शेतकऱ्यांचा सरसकट पीकविमा मंजुर करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इगतपुरी तालुका इंदिरा काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. आमदार हिरामण खोसकर, मविप्रचे संचालक ॲड. संदिप गुळवे, इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव, शेतकरी नेते पांडुरंग मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांच्याकडे याबाबत आज निवेदन दिले. यावेळी काँग्रेसचे प्रांतीक सदस्य कचरू पाटील शिंदे, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुदाम भोर, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष जयराम धांडे, उत्तम शिंदे, एकनाथ भोर, खंडू शिंदे, भानुदास बोराडे, सुरेश आवारी, सुरेश धोंगडे, ॲड. जी. पी. चव्हाण, नितीन गव्हाणे, नंदाबाई कोकणे, शिवाजी मोंढे, राजु अत्तार, आरिफ शेख,अजीज शेख, सलिम शेख, सतार मणियार आदींसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इगतपुरी तालुक्यातील प्रमुख पीक असणाऱ्या भात पिकावर दरवर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा अस्मानी व सुल्तानी संकट आले आहे. आधीच वेगवेगळ्या रोगांनी भातपिकाचे नुकसान झाले असतांना उरल्या सुरल्या भातपिकाची सोंगणी सुरू असतांना बागायती पिकांतील टोमॅटो, वांगे, कारले, कोथिंबीर, मेथी आदी पिकांचेही अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. ऐन सोंगणीतच पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आधीच गेल्यावर्षी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊनही पिकविम्याची नुकसानीपोटीची मिळणारी रक्कम अद्यापही मिळाली नसतांना यंदाही तीच परिस्थिती उदभवल्याने शेतकऱ्यांची पुरती वाट लागली आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासह ज्या शेतकऱ्यांनी पीकविमे काढले असतील अशा शेतकऱ्यांना यंदा तरी पीकविम्याची नुकसानीपोटी रक्कम द्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!