घोटी पाणी योजनेला प्रशासकीय मान्यता आणि इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रमुख प्रश्न सोडवा : माजी आमदार गावित यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

वाल्मिक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १८

इगतपुरी  त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लागावे यासाठी माजी आमदार निर्मला गावित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे. यात प्रामुख्याने इगतपुरी तालुक्यातील घोटी शहराचा पाणीपुरवठा प्रश्न मांडत तो सोडवण्याची आग्रही मागणी केली. ह्या योजनेची प्रलंबित प्रशासकीय मान्यता लवकर देण्याचीही त्यांनी मागणी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मीटिंग ( झूम मिटिंग ) द्वारे थेट संवाद साधताना सौ. गावितानी हे साकडे घातले.

माजी आमदार निर्मला गावित यांनी आपल्या आमदारकीच्या  काळात या योजनेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. ही योजना सौ. गावितांच्या विशेष प्रयत्नामुळे मंजुर झालेली आहे. या योजनेचा सांगोपांग अभ्यास करुन वाकी खापरी धरणाऐवजी भावली धरणातुन थेट पाईपलाईन व्हावी यासाठी या योजनेची प्रशासकीय मान्यता प्रलंबित आहे. ती तातडीने देण्यात यावी व घोटी शहराचा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढावा अशी अपेक्षा सौ. गावितांनी संवादावेळी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली.

दरम्यान या प्रश्नाबरोबरच भावली धरण परिसराला पर्यटन स्थळ घोषित करावे, गोंदे औद्योगिक वसाहतीत स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगारात प्राधान्य मिळावे आदी प्रश्नाबाबतही सौ. गावितानीं थेट मुख्यमंत्री महोदयांशी संवाद साधला. सर्वच प्रश्नाबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सहानुभूती व्यक्त करुन हे प्रश्न सोडवण्याचे ठोस आश्वासन दिल्याचे सौ. गावित यांनी सांगितले. स्थानिक युवकांना औद्योगिक वसाहतीत प्राधान्य मिळावे यासाठी सौ. गावित यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. ना. देसाई यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ते आदेश पारित करण्याबाबत शब्द दिला.
                                   

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!