इगतपुरीनामा न्यूज – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने १२७ इगतपुरी (अ. ज. ) विधानसभा मतदार संघांतर्गत २५ व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार संघातील नागरिकांनी आपल्याला मतदान केंद्रावर उपस्थित राहून यादीत आपल्या नावाची खात्री करावी. हरकत असल्यास दुरूस्तीबाबत आवश्यक कागदपत्रे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावी असे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी इगतपुरी विधानसभा मतदार संघ तथा इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे व सहा. मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार इगतपुरी अभिजित बारवकर, निवडणूक नायब तहसीलदार वर्षा वाघ यांनी केले आहे.
२५ व २६ नोव्हेंबर २०२३ या दोन्ही दिवशी इगतपुरी (अ.ज) विधानसभा मतदार संघाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे २ व ३ व डिसेंबर २०२३ रोजी तृतीयपंथी, महिला सेक्स वर्कर, भटक्या व विमुक्त जमाती याप्रकारच्या वंचित घटकातील मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या दोन्ही शिबीरांचा लाभ घ्यावा, नवीन मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. नागरिकांनी आपले नाव, छायाचित्र, पत्ता दुरूस्ती, मयत नागरिकांचे नाव मतदार यादीतून कमी करून मतदार यादी शुद्धीकरण करण्यास मदत करावी असेही उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे, तहसिलदार अभिजित बारवकर, निवडणूक नायब तहसीलदार वर्षा वाघ यांनी सांगितले.