
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील टिटोली शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर आढळून आला होता. बिबट्याने बऱ्याच शेळ्या, कुत्रे यांचा फडशा पाडला होता. येथील नागरिकांनी पिंजरा लाऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी इगतपुरी वन विभागाकडे केली होती. वन विभागाने तात्काळ दखल घेत या ठिकाणी पिंजरा लावला होता. काल रात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या लावलेल्या पिंजऱ्यात येऊन अडकला. बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्याची माहिती गावात पसरताच घटनास्थळी बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली. वनविभागाने पिंजरा ताब्यात घेऊन बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी नाशिक येथे नेले आहे. त्यास लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे अशी माहिती इगतपुरीचे प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी दिली.