
इगतपुरीनामा न्यूज – गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीतील सिजारे बोनेटी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या परिसरात अनेक बिबट्याचा वावर आढळून आला आहे. गेल्या आठ दिवसापासून कंपनीमध्ये सतत बिबट्या निदर्शनास येत आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांना याविषयी सिक्युरिटी गार्ड यांनी वेळोवेळी माहिती दिली. रात्री नऊ वाजेनंतर बिबट्या कंपनीच्या परिसरात फिरत असतो. यामुळे कंपनी कामगार आणि सिक्युरिटी गार्ड मध्ये भीती पसरली आहे. कंपनीचे एचआर मॅनेजर तुषार दासणुर यांनी कंपनीमध्ये लावलेले सीसीटीव्ही टीव्ही फुटेज पाहिले असता तीन वेगवेगळे बिबटे निदर्शनास आले. यासंदर्भात वन परिमंडळ अधिकारी एस. के. चौधरी, वनरक्षक कावेरी पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत इगतपुरीचे प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी नियोजन करण्यात आले. बिबट्याला घाबरून न जाता त्याच्यापासून बचाव करण्यासाठी कंपनीतील सर्व कामगारांना मार्गदर्शन केले. लवकरात लवकर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येईल असे सांगण्यात आले.