इगतपुरीनामा न्यूज – मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर अवघा समाज उभा ठाकला असून ह्या आंदोलनाला वेगवेगळ्या समाजाने पाठिंबा दिलेला आहे. समाजाचा लढा निर्णायक टप्प्यावर आला असल्याने ह्या परिस्थितीत ह्या आंदोलनाला बळ देण्यासाठी स्व. गोपाळराव गुळवे यांच्या जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. समाजासाठी दादांनी दिलेले योगदान आणि तोच वारसा पुढे चालवण्यासाठी जिल्ह्याचे नेते मविप्रचे संचालक ॲड. संदीप गोपाळराव गुळवे यांनी हा निर्णय घोषित केला आहे. जयंतीनिमित्त सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. फक्त सकाळी १० वाजता घोटी येथील पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. ॲड. संदीप गुळवे यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर मराठा समाजातील सर्वच लोकांकडून निर्णयाचे स्वागत झाले आहे. ॲड. संदीप गुळवे यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे.
दरवर्षी १ नोव्हेंबरला लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे यांची जयंती साजरी होते. स्व. दादांनी आयुष्यभर राजकारण, समाजकारण करतांना समाजातील तळागाळातील माणूस हाच केंद्रबिंदू मानला. दरवर्षी जन्मदिनाच्या निमित्ताने सर्वसामान्य माणसाच्या समस्या, प्रश्न, अडचणी सरकार, मंत्री महोदय यांच्या समोर मांडण्यासाठी प्रत्येक वर्षी मंत्र्यांना आमंत्रित करून तालुक्याचे प्रश्न सोडवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न होता. आयुष्यभर सर्वच समाजातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ह्या नेत्यावर लोकांनी सुद्धा प्रचंड प्रेम केले. त्यामुळे त्यांच्या जाण्याने ह्या तालुक्यातील वाड्या-वस्त्या सुद्धा धाय मोकलून रडल्या. त्यांना देवाघरी जाऊन १३ वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांची कायम उणीव भासते आहे. ह्या लोकनेत्याच्या मृत्यूनंतर ह्या तालुक्याने सार्वजनिक स्वरूपात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला. दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी त्यांची जयंती मोठ्या उत्साहात होत असते. त्यानुषंगाने ह्यावर्षी सुद्धा दादासाहेब गुळवे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा समाजाच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी स्व. गोपाळराव गुळवे यांच्या जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.