इगतपुरीनामा न्यूज – मराठा समाज आरक्षणाचे केंद्रबिंदू मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती झपाट्याने खालावत आहे. मराठा समाजाच्या मागण्या मांडण्यासाठी ते उपोषणाला बसले असून त्यांच्या आरोग्याबद्दल खरी चिंता आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अन्यथा शांततेत सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनामुळे राज्याची शांतता धोक्यात येऊ शकते असा इशारा स्वराज्य पक्षाने दिला आहे. सुरु असलेल्या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने आज नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत पदाधिकाऱ्यांनी शासनाला इशारा दिला. यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, राज्य कार्यकारणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात, जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे, स्वराज्य निमंत्रक उमेश शिंदे, नितीन दातीर, सागर पवार, गजानन हराल, अंकुश सायखेडे, शशी राजपुत, महेंद्र खेडकर, लक्ष्मण हनवटे, अजय कश्यप, गणेश नाठे, पवन भोसले, प्रविण गोसावी उपस्थित होते.
उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी म्हणाले की, आमचे नेते मनोज जरांगे पाटील व इतर आंदोलक यांची काळजी घेणे आवश्यक आहे. राज्य कार्यकारणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात म्हणाले की, मराठा समाज विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारकडून धीराने वाट पाहत आहे. तथापि, प्रगतीच्या अभावामुळे समाजात निराशा निर्माण झाल्याने दीर्घकाळ विरोध सुरू आहे. याकडे तातडीने लक्ष न दिल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका आहे. जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे म्हणाले की, आंदोलन आणि आरक्षणप्रकरणी शासनाने सत्वर निर्णय घ्यावा. समाजातील शांतता आणि सद्भावना टिकवून ठेवण्यासाठी त्वरीत निर्णय घेणे अत्यावश्यक आहे. प्रशासनाची निष्पक्षता आणि कार्यक्षमतेची आम्ही नेहमीच कदर केली आहे. एक जबाबदार पक्षाचा जिल्हाप्रमुख म्हणून मला ठाम विश्वास आहे की याप्रकरणी सरकारच्या हस्तक्षेपामुळे कायमस्वरूपी तोडगा निघून न्याय व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा निर्माण होईल. स्वराज्य निमंत्रक उमेश शिंदे व नितीन दातीर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे. यामुळे महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती व राज्यातील शांतता राखण्यास मदत होईल असे सांगितले.