इगतपुरीनामा न्यूज – कर्तव्यात कसुर केल्या प्रकरणी घोटी ग्रामपालिकेचे ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मित्तल यांनी निलंबित केले आहे. घोटी शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत अनेक ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांना निवेदन देऊन बेकायदेशिर बांधकाम करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी केली होती. घोटी बुद्रुक येथील मिळकत क्र. ६१० व ६११ ची मिळकत घोटीतील दत्तात्रय हरिभाऊ शिंदे यांच्या बांधकामांची चुकीची नोंद केल्याबद्धल आणि अन्य ३ दोषारोपांमुळे ग्रामविकास अधिकारी रविंद्र धुंदाळे यांनी त्यांच्या शासकीय कर्तव्यात कसूर केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासह गाळे बांधकामाची ई-निविदा करतांना मक्तेदाराची क्षमता नसतांना मक्तेदारास काम देणे, प्रथम गाळे मालकाकडून डिपॉझिट परत केल्यानंतर नविन व्यक्तीला विहित पध्दतीने कार्यवाही करून गाळे भाड्याने न देण्याबाबत, ग्रामपंचायतीच्या गाळ्यांचा लिलाव करतांना लिलाव खडांतील अटीचा भंग झालेला असतांनासुध्दा लिलाव धारकांची रक्कम जप्त करून फेर लिलाव न करणे, दत्तात्रय हरिभाऊ शिंदे यांचे मिळकत बांधकामांची चुकीची नोंद असे ४ दोषारोप असल्याने घोटी बुद्रुकचे ग्रामविकास अधिकारी रविंद्र सुधाकर धुंदाळे निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी हा आदेश काढला आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी चौकशी करून कर्तव्य कसुरी बाबत दोषारोप अहवाल सादर केला होता. त्यानुसार ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे यांनी त्यांच्या शासकीय कर्तव्यात कसूर केला आहे असे स्पष्ट झाले. त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, १९६७ चे नियम ३ चा भंग केला आहे. म्हणून त्यांना आदेशाच्या दिनांकापासून जिल्हा परिषदेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय सुरगाणा पंचायत समिती राहील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. श्री. धुंदाळे यांनी सिन्नर व नांदगाव तालुक्यात एका ग्रामपंचायतीत कार्यरत असतांना तेथेही चुकीचे काम केले म्हणुन यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. याबाबत त्यांना प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group