
इगतपुरीनामा न्यूज – देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांशी रक्ताचे नाते नसले, तरी ते अहोरात्र देशाचे रक्षण करतात. त्यामुळे या हजारो सैनिकांना भाऊ मानणाऱ्या टिटोली येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेतील चिमुकल्या बहिण भावांनी भेटकार्ड व राख्या सीमेवर पाठवल्या आहेत. ‘एक धागा शौर्याचा, एक राखी अभिमानाची’ या विचारांना अनुसरून टिटोली येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनीं व विद्यार्थ्यांनी सीमेवर तैनात सैनिकांसाठी राख्या व शुभेच्छा पत्र पाठवले आहेत. भारतीय सैनिक सलग बाराही महिने संरक्षणासाठी सीमेवर डोळ्यात तेल घालून काम करत असतात. त्यामुळे त्यांना रक्षाबंधन या महत्त्वाच्या सणालाही आपल्या बहिणीच्या हाताने राखी बांधायला येणे शक्य होत नाही. अशा सैनिकी भावांचा या सणाच्या दिवशी उत्साह वाढावा, त्यांच्या हातून अखंडपणे चांगली देशसेवा घडावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला. शाळेतील शिक्षकांचा पुढाकार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा उपसरपंच अनिल भोपे आणि सर्व सदस्यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम पार पडला. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सदस्य तानाजी बोंडे, सदस्या निर्मला चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते दिपक चव्हाण, मुख्याध्यापिका मंगला शार्दूल, राजकुमार गुंजाळ, प्रतिभा सोनवणे, मंगला धोंडगे, स्नेहल शिवदे, राज्य आदर्श शिक्षक सिध्दार्थ सपकाळे आदींनी परिश्रम घेतले.
