इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
२८ वर्षांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील खैरगावच्या शिदवाडी येथील वीर जवानाला दहशतवाद्यांसोबत लढतांना वीरगती प्राप्त झाली. ह्या शहीद जवानाच्या गौरवशाली कार्याची यशोगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. २८ वर्षांपासून शहीद जवानाचे रखडलेले स्मारक उभे करण्यासाठी खैरगावचे लोकनियुक्त सरपंच ॲड. मारुती आघाण आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. ह्या अलौकिक कार्याला माजी सैनिक संघटना इगतपुरी यांनी मोठे पाठबळ दिले असून संघटनेच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील पहिले शहीद स्मारक निर्मित होणार आहे. पुढच्या पिढीला वीरांचा इतिहास माहीत व्हावा, वीरांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, शहीदांचा सन्मान व्हावा यासाठी शहीद स्मारक दीपस्तंभ ठरणार असल्याचे माजी सैनिक विजय कातोरे यांनी सांगितले.
2 नोव्हेंबर १९९२ ह्या दिवशी नागालँडमध्ये ऑपरेशन रक्षक राबवले गेले. त्या दिवशी दहशतवाद्यांसोबत भारतीय सैनिकांची चकमक झाली. यावेळी झालेल्या जोरदार चकमकीत इगतपुरी तालुक्यातील खैरगावच्या शिदवाडीचे वीर जवान राजेंद्र धोंडू भले लढतांना शहीद झाले होते. २८ वर्ष उलटून गेली तरी ह्या वीर जवानाचे शहीद स्मारक उभे राहिले नाही. याची खंत खैरगाव भागातील ग्रामस्थांसह खैरगावचे लोकनियुक्त सरपंच ॲड. मारुती आघाण यांना वाटली. स्मारक उभे राहावे यासाठी ह्या सर्वांनी माजी सैनिक संघटना इगतपुरी आणि माजी सैनिक विजय कातोरे यांना साकडे घातले. त्यानुसार माजी सैनिक संघटना आणि खैरगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने लवकरच इगतपुरी तालुक्यातील पहीले शहीद स्मारक उभे राहणार आहे.
स्मारक उभारण्याच्या महान कार्यात इगतपुरी तालुक्यातील सर्वांनी मदतीचा हातभार लावुन सहकार्य करावे असे आवाहन माजी सैनिक विजय कातोरे यांनी केले. खैरगाव येथे झालेल्या भेटीवेळी माजी सैनिक विजय कातोरे, तुकाराम काजळे, यादव पटेकर, श्रावण फासगे, भगवान सहाणे, रोहन साबळे, शांताराम सहाणे, रविंद्र शार्दुल, किसन हंबीर, मणीराम मदगे सखाराम पाचरणे, सुरिंदरपाल ढिलोन, नंदू आंबेकर, विठ्ठल मेंगाळ, किरण वाजे, सुनील भले, शहीद जवान पत्नी वीर नारी गंगूबाई भले, वीर नारी ललिताबाई भले आदी उपस्थित होते. गुणाजी गांगड, प्रकाश भले, शिवाजी शिद, काशिनाथ सावंत, महादू गांगड, कावजी भले, अशोक भले, सरपंच ॲड. मारुती आघाण, उपसरपंच गणेश गायकर आदींसह खैरगाव परिसरातील ग्रामस्थ हजर होते.
शहीद राजेंद्र धोंडू भले यांचे स्मारक उभे राहत आहे हे आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानास्पद आहे. ह्यामुळे वीरांचा शौर्यशाली इतिहास सर्वांना प्रेरक ठरेल. ह्या आदर्श कामासाठी इगतपुरी तालुक्यातील नागरिकांनी आपली यथाशक्ती मदत करणे आवश्यक आहे. खैरगाव ग्रामस्थांचे माजी सैनिक संघटनेतर्फे आम्ही आभार मानतो.
- विजय कातोरे, तुकाराम काजळे ( माजी सैनिक )