लाडक्या ग्रामसेवकांना निरोप देताना तोरंगणचे ग्रामस्थ रडले

सुनिल बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण त्र्यंबक येथील ग्रामसेवक सचिन पवार यांची नाशिक तालुक्यात बदली झाली. त्यानिमित्ताने झालेल्या निरोप समारंभात गावकऱ्यांना मात्र अश्रू अनावर झाले. गेल्या पाच वर्षापासून पवार हे तोरंगणला आल्यापासून त्यांनी सर्वां सोबत मिळते जुळते घेतले. ग्रामपंचायत म्हणजे आपसातील वाद आणि अंतर्गत कुरघोडी असते. परंतु पवार हे कार्य उत्तम पेलत आपल्या कामाच्या आणि मवाळ स्वभावातुन सर्वांना आपलेसे वाटू लागले, लहानपणापासूनच अंगी धार्मिक वृत्ती त्यातूनच लहान- थोर मंडळीना माऊली या शब्दाने आवाज देऊन येथील प्रत्येक नागरिकांच्या मनात घर केले.

त्यांनी तोरंगण त्र्यंबकचा विकास साधला. गावात वृक्ष लागवड, रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, पाणी पुरवठा योजना अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. कुसुमाग्रजांचा वारसा लाभलेल्या या तोरंगणच्या नागरिकांनीही मोलाची साथ देत आणि त्यांच्या बरोबरीने उभे राहून गावचा विकास साधला आहे. परंतु शासकीय सेवेत असताना प्रत्येक कर्मचाऱ्यांना बदली काही नवीन नाही. परंतु काही माणसं आपल्या कामाच्या जोरावर जणमाणसांच्या मनाचा ठाव घेऊन जात असतात. आज गावच्या लाडक्या भाऊसाहेबांना निरोप देताना तोरंगणवासीयांच्या डोळ्यात पाणी तरळले.

यावेळी जयवंत जाधव, सरपंच माया जाधव, मधुकर जाधव, नामदेव गायकवाड, शंकर जाधव, अरुण जाधव, राजाराम आंडे, राहुल जाधव, योगेश जाधव, लक्ष्मण जाधव, संगणक परिचालक महेंद्र खोटरे, पोलीस पाटील निवृत्ती जाधव, चंदर कर्डेल, अमृता जाधव, परशराम जाधव, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक, आश्रम शाळा मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षापासून आदिवासी भागात काम करण्याची संधी मला मिळाली. माझं गाव तसं धार्मिक कविवर्य कुसुमाग्रजांचा वारसा लाभलेले गाव. येथील माणसं तितकीच प्रेमळ. या भावुक प्रसंगात गाव सोडताना या जीवाभावाच्या माणसापासून बाजूला जाणे कठीण आहे. तुम्ही चांगल काम केलं तर लोक तुम्हाला डोक्यावर घेणारच. आठवणी कायम स्मरणात राहतील. या गावाशी संवाद कधी तुटणार नाही. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन चालू राहील. सर्वांचे आभार.
- सचिन पवार, ग्रामसेवक

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!