

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाJEE व NEET परीक्षेच्या तयारीसाठी निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची राहण्याची, जेवणाची मोफत व्यवस्था शासन करणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यात परीक्षा घेण्यात आली. ह्यासाठी २ हजार ३३२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून १६३ विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात आली. ह्यामध्ये घोटी येथील जनता विद्यालयाच्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये यश किरण वारुंगसे, पार्थ किरण पेंढारकर, वैष्णवी भाऊराव जाधव, रवी दीपक कोरडे, विद्या पांडुरंग गांगुर्डे, यश ज्ञानेश्वर येलमामे यांनी यश मिळवले आहे. ह्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यालय परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले.