“इगतपुरीनामा” बातमीचा परिणाम – इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून विधानसभा अधिवेशनात तातडीने लक्ष्यवेधी दाखल : आदिवासी भागातील रस्त्यांसाठी नियमांमध्ये शिथिलता आणण्याची केली मागणी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील तळोघ जुनवनेवाडी येथे रस्ता नसल्याने वनिता भाऊ भगत ह्या आदिवासी महिलेला आपला प्राण गमवावा लागला. याबाबत शासनाच्या यंत्रणेचे वाभाडे काढणारी वस्तूनिष्ठ बातमी “इगतपुरीनामा” वर प्रसिद्ध झाली. बातमी प्रकाशित झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. विविध अधिकारी आणि वृत्तसंस्थांनी ह्याबद्दल लक्ष घालून जुनवणेवाडी येथील रस्त्याचा विषय हाती घेतला. एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक भगवान मधे यांनीही याप्रकरणी कठोर भूमिका घेतली. इगतपुरीनामा मधील प्रसिद्ध बातमीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी तातडीने दखल घेऊन विधानसभेच्या अधिवेशनात याप्रकरणी लक्ष्यवेधी दाखल केली. विधानसभा अध्यक्ष महोदयांनी आमदारांना याप्रकरणी बोलण्यास संधी दिली. शासनाने नियमामध्ये शिथिलता आणून रस्त्यांची कामे करावीत. अडीच वर्षांपूर्वी सुद्धा हा विषय मांडला असून शासनाने दखल घ्यावी असे ते म्हणाले. इगतपुरीनामाच्या बातमीमुळे शासन यंत्रणा जागी होऊन जुनवणेवाडीच्या रस्त्याचे दुखणे लवकरच मिटेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

याबाबत आमदार हिरामण खोसकर म्हणाले की एका आदिवासी मातेला प्राण गमवावा लागला ही खेदजनक बाब आहे. ह्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतुन मागणी केलेली आहे. आदिवासी उपजोजना 5054, आदिवासी उप-योजना 3054 व इतर काही योजनेतुन मुख्यमंत्री महोदय व आदिवासी विकास मंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून वेळोवेळी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. परंतू अद्याप ह्या व अशा अनेक रस्त्यांना मंजुरी मिळालेली नाही. DPDC मध्ये या बाबत मागणी करूनही ज्या रस्त्यांना VR व ODR नंबर नाही अशा रस्त्यांना मान्यता दिली जात नाही. जुनवनेवाडी तळोघ या रस्त्याला V.R नंबर नसल्याने मंजुरी मिळालेली नाही. शासनाकडे या रस्त्यांची नोंद नसल्याने यांना मंजूरी मिळत नाही. म्हणून शासनाने किमान आदिवासी मतदार संघात तरी या जाचक अटी शिथील कराव्या. जेणेकरुन अशा तांत्रिक अडचणींमुळे लोकांना जीव गमवावा लागणार नाही. अजुन किती निष्पापांचे जीवाशी खेळणार अशी खंत आमदार हिरामण खोसकर साहेब यांनी व्यक्त केली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!