शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
इगतपुरी तालुक्यातील आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी ग्रामीण रूग्णालय आहे. शहराजवळ मुंबई आग्रा महामार्ग, रेल्वे स्थानक, तालुक्याचे विविध शासकीय निमशासकीय कार्यालये असुन ग्रामीण भागातील अनेक खेडे पाडे व वाड्या वस्त्यातील रूग्णांना या ठिकाणी उपचार मिळतो. म्हणुन तालुक्याच्या केंद्रस्थानी असलेल्या ग्रामीण रूग्णालयालगत असलेल्या इमारतीत ट्रामा केअर सेंटर चालू करावे या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ यांना देण्यात आले.
या ग्रामिण रुग्णालयाने कोरोना काळात मोठ्या प्रमाणात रूग्णसेवा केली असुन अनेकांचे प्राण वाचवले आहेत. एखादा मोठा अपघात अथवा कोणतीही मोठी घटना घडली तर रुग्णांना नासिक येथे पुढील उपचारासाठी हलवण्याशिवाय पर्याय नसतो. नासिक येथे नेत असताना रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. म्हणून ट्रामा केअर सेंटर सुरू करून सुविधा उपलब्ध कराव्यात. रूग्णसेवा सुरळीत मिळावी. यासाठी वैद्यकीय उपकरणे उपलब्ध व्हावीत. आधुनिक तंत्रज्ञान व वाढीव कर्मचारी देऊन रुग्णांची सोय व्हावी. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण, जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरुपा देवरे, डॉ. खैरे, डॉ. गौरव शिरोळे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, शहराध्यक्ष वसीम सय्यद, कार्याध्यक्ष दीपक मावरीया, युवक शहराध्यक्ष ज्ञानेश्वर पासलकर, उपाध्यक्ष प्रवीण कदम, युवक उपशहराध्यक्ष तोरफ कुरेशी आदी उपस्थित होते.