
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीसारख्या आदिवासी अतिदुर्गम तालुक्यात विकासाच्या वल्गना करणाऱ्या शासन यंत्रणेच्या कारभाराचा फटका आदिवासी नागरिकांना चांगलाच बसत आहे. गतिमान सरकार आणि त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे इगतपुरी तालुक्यातील तळोघ जुनवणेवाडी येथील गरोदर महिलेला प्राण गमवावा लागला आहे. ह्या गावाला रस्ता नसल्याने संबंधित गरोदर महिला आपल्या नातेवाईकांसह पहाटे अडीच वाजता अडीच किमी पायी चालत दवाखान्यापर्यंत पोहोचली. मात्र पायपीट, प्रसूतीवेदना, पाऊस यामुळे झालेल्या विलंबामुळे ह्या महिलेने दवाखान्यात प्राण सोडला. तिचा मृतदेह घरी नेण्यासाठी सुद्धा चक्क झोळी करून तिला आज दुपारी नेण्यात आले. करोडो रुपयांच्या विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या शासनाला लाजिरवाणी असणारी ही घटना असून ह्या गावात तातडीने रस्ता करावा अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक भगवान मधे यांनी केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतर सुद्धा ह्या गावाला रस्ता होत नसेल तर ह्या स्वातंत्र्याचा फायदा काय अशी प्रतिक्रिया गावातील युवकांनी दिली.
तळोघ ग्रामपंचायत हद्धीत जुनवणेवाडी ही आदिवासी वस्ती असून मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी गावकऱ्यांना अडीच किमी अतिशय कच्च्या रस्त्याने यावे लागते. हा कच्चा रस्ता पावसामुळे चिखलमय झालेला आहे. जुनवणेवाडी येथील वनिता भाऊ भगत ह्या गरोदर आदिवासी महिलेला प्रसूतीवेदना सुरु झाल्याने पहाटे अडीच वाजता दवाखान्यात जाण्यासाठी नातेवाईक आणि तिने पायपीट केली. जास्तच त्रास होऊ लागल्याने तिला डोली करून त्यामध्ये झोपवण्यात आले. अखेर दवाखान्यात पोहोचल्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी घरी नेण्यासाठी सुद्धा रस्त्याची समस्या असल्याने डोली करून न्यावे लागले. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. गरज नसलेल्या भागात कोट्यवधी रुपयांचे रस्ते करण्यात येत असतात. मात्र जुनवणेवाडीसारख्या अनेक गावांत रस्ताच नसल्याने अनेक निरपराध व्यक्तींना आपला जीव गमवावा लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.