माहिती तंत्रज्ञानाचा वापर करताना धोक्यांचाही विचार करावा – सहाय्यक पोलीस आयुक्त साेहेल शेख : नवजीवन विधी महाविद्यालय आणि इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर जागरूकता दिवस

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असून, भविष्यात ते प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असणार आहे. माहिती तंत्रज्ञानाचे फायदे असले तरी धोकेदेखील आहेत. त्यामुळे त्याचा वापर करताना सायबर जागरूकता असणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सहाय्यक पोलीस आयुक्त साेहेल शेख यांनी केले. नवजीवन विधी महाविद्यालय आणि इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायबर जागरूकता दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्या डॉ. शाहिस्ता इनामदार लिखित ‘इण्ट्रडक्शन टू इथिकल हॅकिंग ॲण्ड सायबर लॉ’ पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी एसडीएसचे संचालक पीयूष सोमाणी, तर व्यासपीठावर सायबर ॲड. दिलपालसिंग राणा, तन्मय दीक्षित, नवजीवनचे सचिव विजय काळे,  सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते. श्री. शेख पुढे म्हणाले की, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करताना पुरेशा माहितीअभावी चुका होण्याची शक्यता आहे. यातून आपली फसवणूक होऊ शकते. बँकिंगचा वापर करतान आपले पिनकोड सुरक्षित ठेवणे, सोशल मीडियाचा वापर करताना आपले फोटो, इतर माहिती चोरी होऊन त्याचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

पीयूष सोमाणी म्हणाले की, सॉफ्टवेअर क्षेत्रात दिवस-रात्र काम करणाऱ्यांना सायबर सुरक्षेबाबत अधिक सजग असणे गरजेचे आहे. नवजीवन विधी महाविद्यालयात सुरू होणाऱ्या सायबर सुरक्षा अभ्यासक्रमासाठी इएसडीएसकडून विद्यार्थी पाठविण्याची ग्वाही सोमाणी यांनी दिली. ॲड. दिलपालसिंग राणा, ‘इण्ट्रडक्शन टू इथिकल हॅकिंग ॲण्ड सायबर लॉ’ या पुस्तकातून नागरिकांना उपयुक्त माहिती उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. प्राचार्या शाहिस्ता इनामदार यांनी सांगितले की, सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाइल आल्याने साेशल मीडियासह विविध ॲप, साइटस‌् आदींचा वापर वाढला आहे. मात्र, वापरकर्त्यांना त्यांची पुरेशी जाण नसल्यास फसवणूक होऊ शकते. जशी एका क्लिकवर जशी हवी ती माहिती मिळवता येऊ शकते तसेच एका क्लिकवर वापरकर्त्यांचे बँक खाते झीरोवर येऊ शकते. त्यामुळे सायबर सुरक्षा महत्त्वाची असून, पुस्तकातून याबाबत अधिक विस्तृत माहिती वाचकाला देण्याच प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले. तन्मय दीक्षित, विजय काळे, सोमनाथ चौधरी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महेंद्र विंचूरकर, अनिल देशमुख, प्रा मकरंद पांडे, ग्रंथपाल मंगल पाटील, प्रा. शालिनी घुमरे, पेखळे, प्रा. किरण क्षत्रिय, प्रा जीवन वाघ, अतुल उंबरकर, घनश्याम कांबळे, विश्वास शेळके आदी उपस्थित होते. यशस्वी पवार हिने सूत्रसंचालन, तर प्रियंका ओसवाल हिने आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रिझवान पिरजादे, के. वाय. देशमुख यांच्यासह इएसडीएसच्या चेतन चांदुळे, अविनाश भांडारकर, राजेश बागुल आदींसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे विश्वस्त सुभाष देशमुख, विजया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!