बीएड, एमएड अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश नोंदणीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ द्यावी : आमदार सत्यजित तांबे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

इगतपुरीनामा न्यूज – उच्च शिक्षण विभागांतर्गत बीएड आणि एमएड या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ( सीईटी सेल ) मुदतवाढ दिली आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या अजूनही काही समस्या असल्याने ही मुदतवाढ पुरेशी नाही. परिणामी ३१ जुलैपर्यंत ही मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या या मागणीची दखल घेत आमदार सत्यजित तांबे यांनी याबाबत मुदतवाढीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. विद्यार्थ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी किंवा इतर कोणतीही अडचण असल्यास ती सोडविण्यासाठी मुदतवाढ दिल्याने पुरेसा वेळ मिळेल असे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आतापर्यंत ४७ हजार ३७३ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. तर त्यातील ४१ हजार ७३९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले आहेत. तर ३० हजार ७११ विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी झाली आहे. तर एमएड अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत १ हजार ४९० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यातील १ हजार ११८ विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक झाले आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले होते. परंतुअनेक विद्यार्थी बीएड आणि एमएड प्रवेशापासून वंचित राहणार आहेत. म्हणून राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने बीएड आणि एमएड या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची ऑनलाइन नोंदणी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ करावी, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!