
इगतपुरीनामा न्यूज – सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी २० हजाराची लाच स्वीकारतांना सचिन काशिनाथ म्हस्के ह्या तलाठ्याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार आणि ३ भागीदार यांनी मिळून इगतपुरी तालुक्यात मुरंबी येथे जमीनीची खरेदी केलेली आहे. ह्या जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करून देण्यासाठी लोकसेवक तलाठी सचिन काशिनाथ म्हस्के याने २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. आज ही २० हजार रुपयांची लाच पंच आणि साक्षीदारांच्या समक्ष स्वीकारली. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात तलाठी सचिन म्हस्के अडकला आहे. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप घुगे, एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांच्या पथकाने सचिन म्हस्के याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.