वाडीवऱ्हेच्या हद्दीतील मुस्लिम बांधवांचा बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा निर्णय : दोन्ही समाजाचे सण एकाच दिवशी आल्याने सलोखा जपण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इगतपुरीनामा न्यूज – उद्या गुरुवारी हिंदू बांधवांसाठी महत्वाची असणारी आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांची महत्वपूर्ण बकरी ईद एकाच दिवशी आली आहे. दोन्ही समाजातील एकोपा आणि जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध जपणारी भावना लक्षात घेता वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्धीतील मुस्लिम बांधवांनी एकादशीच्या पर्वावर आलेल्या बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वाडीवऱ्हे पोलिसांनी मुस्लिम बांधवांशी सकारात्मक चर्चा करून केलेल्या विनंतीला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. दोन्ही समाजात सामाजिक सलोखा रहावा यासाठी हा निर्णय घेतल्याने त्यांच्या या निर्णयाचे इगतपुरी तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे. वाडीवऱ्हे पोलिसांच्या प्रयत्नांना उत्तम यश आल्याने ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी विशेष कौतुक केले आहे.

आषाढी एकादशीला पंढरपूरची यात्रा असल्याने महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने वारकरी आषाढी वारी करतात. यावर्षी मुस्लिम बांधवांचाही महत्त्वाचा असलेला सण बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने दोन्ही समाजातील हे सण साजरे करण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत. यासाठी दोन्ही समाजातील सामाजिक सलोखा अबाधित रहावा यासाठी मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशीला बकरी ईदच्या निमित्ताने देण्यात येणारी कुर्बानी न देण्याचा सामूहिक निर्णय घ्यावा असे आवाहन पोलिसांनी केले होते. ह्या आवाहनाला प्रतिसाद देत वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन हद्दीतील मुस्लिम बांधवांनी आषाढी एकदशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाचे सर्व स्तरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. यासाठी वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवऱ्हे पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले.

Similar Posts

error: Content is protected !!