काळुस्ते, भरवज, निरपण ह्या तीन गावातील दारुअड्डे युवकांनी केले बंद : २०० लिटर दारू जमा करून विक्रेत्यांचे केले समुपदेशन

इगतपुरीनामा न्यूज, दि. 9

अवैध गावठी दारूमुळे आदिवासी समाज संपुष्टात येत आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते, भरवज, निरपण ह्या तीन गावातील युवकांनी पुढाकार घेऊन दारू वंद करण्यासाठी आज काम सुरु केले. ह्या युवकांनी संबंधित दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींपर्यंत जाऊन त्यांचे समुपदेशन करून दारूबंदी करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली. त्यानुसार दिवसभरात किमान 200 लिटर गावठी दारूच्या डबक्या जमा करून नष्ट करण्यात आल्या. उद्यापासून ह्या परिसरात गावठी दारू विकली जाणार नाही असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. परिसरातील महिलांनी युवकांच्या उपक्रमाचे स्वागत केले असून पोलिसांनी ह्या कामात आवश्यक ते सर्व सहाय्य देण्याची भूमिका घेतली आहे.

गावठी दारूमुळे आदिवासी समाजात लाचारी आणि गुलामी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यामुळे अनेक युवक दगावले आहेत. गावातील अनेक तरुणांचे संसार उध्वस्त झाले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढून लोकशाही व्यवस्था संपुष्टात आली आहे. त्यामूळे गावातील युवकांनी दारू आणि ताडीबंदी झालीच पाहिजे असा एल्गार पुकारला. परिसरातील सर्व गावठी दारू व ताडीच्या अड्डयावर जाऊन संबंधितांना सूचना दिली. त्यानंतर 200 लिटर दारूचा साठा जमा करुन घेतला. ह्या उपक्रमात संदीप गवारी, राजेंद्र घारे, शरद घारे, सदाशिव घारे, दत्ता घारे, दिपक गवारी, योगेश इदे, गणेश घारे, साईनाथ सुर्यवंशी, गौरव घारे, निशांत मोरे आदी युवक सहभागी होते.

Leave a Reply

error: Content is protected !!