इगतपुरीनामा न्यूज – बदललेल्या गतिमान काळातही आपलं गावपण जपून संस्कार, संस्कृती, सन्मान जपणाऱ्या धामडकीवाडीचा अभिमान वाटतो. सर्वांनी आदर्श घ्यावा असा एकोपा, सामाजिक बांधिलकी यामुळे ह्या वाडीला लौकिक मिळाला आहे. ही वाडी विकसित करण्यासाठी वाचन आणि शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी लाईफ्रेरियन असोसिएशन मुंबई, आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी, ग्रामपंचायत भावली खुर्द यांच्याकडून सुरु असलेले मोलाचे काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन इगतपुरीचे बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी धामडकीवाडी येथे वाचनालय आणि सामाजिक सभागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. निसर्गाने मुक्तहस्ते दिलेले वरदान लाभलेल्या धामडकीवाडीला रस्ता नसला तरी वाचनाच्या माध्यमातुन विकासाचा रस्ता लाभणार आहे असेही ते म्हणाले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष कुंतल भंडारे यांनी सर्वांचे विशेष कौतुक करून यापुढेही ह्या वाडीला आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे वचन दिले.
वाडीतील ग्रामस्थांसाठी सांस्कृतिक सभागृह व तरुणांसाठी ग्रंथालय असावे यासाठी धामडकीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी हे अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. त्यामुळे लाईफ्रेरियन असोसिएशन मुंबई यांचे आर्थिक सहाय्य, ग्रामपंचायत भावली खुर्द यांच्या योगदानातून हा उपक्रम प्रत्यक्षात आकाराला आला. ४०० लोकवस्ती धामडकीवाडीने सामाजिक एकजूट दाखवत एक रुपया सुद्धा मजुरी न घेता अवघ्या एका महिन्यात श्रमदान करून इमारतीचे बांधकाम पूर्ण केले. लायफेररिअन असोसिएशन लोकांमध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी गावागावात ग्रंथालयाद्वारे वाचन संस्कृती जपत आहेत. धामडकीवाडीत ग्रंथालय व सभागृह हा पहिलाच प्रयोग त्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला.
यावेळी पेहेचान प्रगती फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रगती अजमेरा, अभिनव अजमेरा यांच्याकडून विद्यार्थ्यांना दप्तर, रेनकोट व सॅन्डलचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लायफेररिअन सदस्य हिरू भोजवानी, केतकी बेडेकर, ऋचा ढोलकीया, भावली खुर्दच्या सरपंच जिजाबाई आगिवले, निवृत्त केंद्रप्रमुख श्रीराम आहेर, ग्रामसेविका रुपाली जाधव, आरोग्यसेवक बिपीन नेवासकर, पत्रकार वाल्मिक गवांदे, शैलेश पुरोहित, खादी ग्रामोद्योगचे व्हॉइस चेअरमन तथा टिटोलीचे सरपंच अनिल भोपे, संचालक भगीरथ भगत, लघुपट दिग्दर्शक धनराज म्हसणे, मागासवर्गीय शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष कैलास बोढारे, इगतपुरी तालुका शिक्षक समितीचे नेते जनार्दन कडवे, राज्य आदर्श शिक्षक सिद्धार्थ सपकाळे, उपक्रमशिल शिक्षक ज्ञानेश्वर बांगर, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ आगिवले, चांगुणा आगिवले, खेमचंद आगिवले, बबन आगिवले, लहानू आगिवले, शिक्षक दत्तू निसरड आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन पत्रकार भास्कर सोनवणे यांनी केले.