इगतपुरीनामा न्यूज – सात देशांमध्ये भारताचे शांती सैनिक म्हणून काम केलेले आणि सध्या इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक विनोद पाटील या लाडक्या शिक्षकाची प्रशासकीय बदली झाल्याने शाळेतील सर्व विद्यार्थी धाय मोकलून रडले. लाडक्या शिक्षकाची झालेली बदली ही लहान कोवळ्या जीवांना अतिशय दुःख देऊन गेली. शिक्षक विनोद पाटील यांच्यासाठी रडणारी ही लहान लहान मुलं पाहून काही पालक आणि सहकारी शिक्षकांनाही अश्रू अनावर झाले. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर विनोद पाटील यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश करून पिंप्री सदो येथे ते रुजू झाले. आठ वर्षांमध्ये काम करत असताना त्यांनी गावकऱ्यांशी विद्यार्थ्यांशी विशेष स्नेह जोडून ते गावाशी एकरूप होऊन गेले. सैनिकी शिस्त अंगी असल्याने तीच शिस्त आपल्या शिक्षकी पेशामध्ये कायम ठेवून विद्यार्थी घडवण्याचं अनमोल कार्य त्यांनी गेल्या बारा वर्षापासून अतिशय प्रामाणिकपणे पार पाडले आहे. इगतपुरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष निवृत्ती नाठे यांनी कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन केले.
शिक्षक विनोद पाटील यांच्या बदली निमित्त आज ग्रामस्थ व सहकारी शिक्षकांतर्फे निरोपाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये अनेक ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्या अश्रूंना मुक्त वाट करून दिली. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षक यांच्यावतीने आज त्यांना हृदयस्थ निरोप देण्यात आला. निरोपार्थी शिक्षक विनोद पाटील यांनी शाळेतील सात वर्गांसाठी भिंतीवरील घड्याळ भेट दिले. नव्याने रुजू झालेले शिक्षक माणिक भालेराव यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास वाकचौरे, माजी अध्यक्ष अमजद पटेल, पोलीस पाटील रमेश पाटेकर, माजी उपसरपंच प्रकाश उबाळे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर कदम, सामाजिक कार्यकर्ते बबलू उबाळे, ज्ञानेश्वर उबाळे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हरिभाऊ कदम, संतोष पाटेकर, रेश्मा पटेल, इम्तियाज कोतवाल, अवचित उबाळे, शिवनाथ उबाळे, सबा पटेल, शाहनवाज पटेल, मुख्याध्यापक सुखदेव ठाकरे, शिक्षक विलास उबाळे, माणिक भालेराव, सौरभ अहिरराव, अतुल अहिरे, प्रशांत देवरे, अब्रार सर आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.