इगतपुरीनामा न्यूज – आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांनी कृषी उत्पादनात वाढ करून समृद्धी साधावी. आपल्या शेतीत पारंपरिक पद्धत सोडून आधुनिकतेची कास धरल्यास उत्पन्नात वाढ होईल. शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांचे उत्पन्न व उत्पादन वाढवावे. यासाठी कृषी विभाग सदैव शेतकऱ्यांना मदत करण्यास तयार आहे असे प्रतिपादन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांनी केले आहे. इगतपुरी तालुक्यातील इंदोरे येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे सभागृहात खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी त्यांनी भात पिकाची लागवड तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञाना अंतर्गत एसआरटी लागवडीबद्धल विस्तृत माहिती दिली. मंडळ कृषी अधिकारी भास्कर गीते यांनी तृणधान्य आणि त्यांचे आहारातील महत्त्व सांगितले. कृषी पर्यवेक्षक किशोर भरते यांनी कृषी यांत्रिकीकरण आणि कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
कृषी सहाय्यक विजय कापसे यांनी भात बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक बीजप्रक्रिया यंत्राद्वारे दाखवत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया यंत्रात बियाणांची प्रक्रिया करून बियाणे लागवड करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच जनार्दन शेणे यांनी कृषी विभागाने दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी गावस्तरीय प्रशिक्षण आणि नियमित सहकार्याबद्दल कृषी विभागाचे कौतुक केले. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी नक्कीच उत्पादन वाढवतील असेही ते म्हणाले. देवराम खतेले यांचे शेतावर एसआरटी भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. सगुणा राइस टेक्नॉलॉजीनुसार भात लागवडीसाठी गादी वाफे तयार करणे, यंत्र कसे वापरावे याबाबत प्रात्यक्षिक करण्यात आले. कार्यक्रमाला कृषी अधिकारी सुभाष गोसावी, कृषी पर्यवेक्षक नानाभाऊ पवार, कृषी सहाय्यक देवेंद्र पाटील, रमेश वाडेकर, मोहिनी चावरा, प्रियांका पांडुळे, वंदना शिंगाडे, दीपा शिंदे, सरपंच जनार्दन शेणे, शेतकरी नथू पिचड, देवराम खतेले, सुनील खतेले, काळू साबळे, चक्रधर साबळे, उपसरपंच बाळू मेंगाळ आणि शेतकरी उपस्थित होते.