
इगतपुरीनामा न्यूज – सीएमए इन्स्टिट्यूट नाशिक चॅप्टरची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी सन २०२३-२७ च्या कार्यकारिणीसाठी सर्वात जास्त मते असणाऱ्या ९ उमेदवारांची कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपद आरिफखान मन्सुरी यांना तर उपाध्यक्षपद अमित जाधव यांना मिळाले. सचिव म्हणून धनंजय जाधव, खजिनदारपदी मैथिली मालपुरे यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रकाश राजपूत, कैलास शिंदे, मयुर निकम, नवनाथ गांगुर्डे, संतोष ब्राह्मणकर व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सुयोग मालपुरे यांची निवड करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला मागील आर्थिक वर्षाचे नफा-तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक मावळते अध्यक्ष सीएमए भूषण पागेरे यांनी सर्व मांडले त्यास सर्वांनी अनुमती देऊन कायम केले. मागील वर्षातील नाशिक चॅप्टरच्या कामकाजाचा आढावा मावळते अध्यक्ष भुषण पागेरे यांनी सभासदांसमोर सादर केला. नाशिक चॅप्टरच्या नावलौकिकात पडलेली भर आणि आजपर्यंतच्या निवडणुकांत एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेले मतदान हे मागील कार्यकारिणीने केलेल्या कामाची पावती आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यानंतर विद्यमान अध्यक्षांनी आपला पदभार नूतन अध्यक्ष आरिफखान मन्सुरी यांच्याकडे सोपवला. मावळत्या सचिव अर्पिता फेगडे यांनी सूत्रसंचालन, आभार मानले. सर्व सीएमए सदस्यांनी नवीन कार्यकारिणीचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.