सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणा : संबंधितांवर कारवाईसाठी इगतपुरी तालुका समता परिषदेचे निवेदन

इगतपुरीनामा न्यूज – ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ नामक वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेले आहे. शरयू ट्रस्ट नावाची संस्था इंडिक टेल्स ही वेबसाईट चालवते. सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती-फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहे असे निवेदन इगतपुरी तालुका समता परिषदेने इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना दिले आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावं आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले. फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून प्रहार केला जात आहे. जागी झालेली मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे. या पोर्टलवर इतिहास पुनर्मांडणीच्या नावाखाली अक्षरशः मोडतोड सुरु आहे. ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे. सावित्रीबाईंच्या बदनामीचा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणावी, सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, माजी नगरसेवक यशवंत दळवी, समता परिषद इगतपुरी तालुकाध्यक्ष शिवा काळे, शिवसेना नेते नंदलाल भागडे, राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष वसिम सय्यद, समता परिषद इगतपुरी शहराध्यक्ष सिध्दार्थ भामरे, घोटी शहराध्यक्ष सुभाष जाखेरे, प्रल्हाद गायकवाड, अक्षय दळवी, महेश शिरसाठ, शरद वायदंडे आदी उपस्थित होते

Similar Posts

error: Content is protected !!