इगतपुरीनामा न्यूज – चांगल्या कामाला नेहमीच महापुरुषांचे आशीर्वाद लागतात. मठाधिपती गुरुवर्य माधव बाबांच्या प्रेरणेने धामणगावच्या ग्रामस्थांनी एकोप्यातून उभारलेल्या मंदिराची निर्मिती अतिशय सूंदर केली आहे. कळस बसल्यावर धामणगाव म्हणजे प्रति पंढरपूरच होईल असे प्रतिपादन जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांनी केले. श्रीक्षेत्र धामणगाव येथे मंगळवारपासून मठाधिपती गुरुवर्य माधव महाराज घुले यांच्या आशीर्वादाने हनुमान मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त तीन दिवसीय कीर्तन सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थांनी केले आहे. याप्रसंगी जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर बोलत होते. आज गुरुवर्य माधव महाराज घुले, उद्या जगदीश महाराज जोशी, उमेश महाराज दशरथे यांचे कीर्तन होणार आहे.
संस्काराने देवत्व येते. वैदिक तत्वात ईश्वर आहे. पुढची पिढी अभिनंदन करण्यासाठी उभी आहे. तुकाराम महाराजांची गाथा वेद आणि अमृताचा वर्षाव असून तुकाराम महाराजांच्या सामर्थ्याची बरोबरी कुणीही करू शकत नाही. तुकाराम महाराजांच्या गाथा वाचनाने चारी वेदांचे पारायण होते. आयुष्यात परमार्थ करताना यज्ञ झाला पाहिजे. धामणगावात उत्तम प्रकारचा कार्यक्रम सुरू झाला आहे. परमार्थ स्वरूप लक्षण सांगताना डॉ. रामकृष्णदास लहवितकर म्हणाले की, हरी हे वेदांचे बीज असून हरी उच्चार केल्यास सर्व देवाचे स्मरण होते. कार्यक्रमावेळी परिसरातील भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.