शरद मालुंजकर : इगतपुरीनामा न्यूज – दारणा नदीला मिळणाऱ्या ओंडओहोळ नदीत घातक पिवळ्या रंगाचे रसायन सोडून जलप्रदूषण करणाऱ्या टँकर चालकावर जलसंपदा व लघुपाटबंधारे विभागाने तातडीने कार्यवाही करीत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुकणे धरणातून निघालेले पाणी ओंडओहोळ नदीच्या माध्यमातून दारणा नदीपात्रात जाते. गोंदे दुमाला, कुऱ्हेगाव, अस्वली, नांदगाव बुद्रुक, जानोरी, पाडळी ह्या गावाशेजारून ही ओंडओहोळ नदी जाते. मात्र ह्या पाण्यामध्ये काही कंपन्यांचे घातक केमिकल टँकरद्वारे टाकले जात आहे. याबाबत या भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून संशय होता अस्वली – नांदगाव बुद्रुकला जोडणाऱ्या पुलावर घातक केमिकल पाण्यात ओतणारा टँकर नुकताच काही जागरूक नागरिकांनी पकडला होता. टँकरचालकाने नागरिकांचा रोष पाहून वाहन सोडून पलायन केले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारी ही घटना असून शेतकऱ्यांच्या जमिनी नापिक करण्यालाही कारणीभूत आहे. याबाबत गुन्हा दाखल न झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा इशारा मनसेने देण्यात आला होता.
याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच लघु पाटबंधारे व जलसंपदा विभाग खडबडून जागा झाला. वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनला सहाय्यक अभियंता विजय ठाकूर ( जलसंपदा व लघु पाटबंधारे विभाग, नाशिक ) यांनी एमएच ०४ एचडी ४५३० या क्रमांकाच्या टँकरवरील अज्ञात टँकर चालकाविरुद्ध नदीचे पाणी प्रदूषित केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही महामार्गावर वाडीवऱ्हे गोंदे या परिसरातील नाल्यामध्ये पावसाळ्यातही घातक केमिकल टँकरने सोडून मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण केले जाते. यामुळे विविध प्रकारचे आजार निर्माण होत असतात. आता तर मुकणे धरणाचे पाणी नाशिकला देखील पुरविले जाते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती आहे. अनेक वर्षांपासून हे जीवघेणे रसायन नदीपात्रात नाल्यामध्ये सर्रास पणे सोडले जाते. असे असताना प्रदूषण नियंत्रण महामंडळ मात्र याबाबत कुठलीच कारवाई का करीत नाही? असे प्रश्न नागरिक विचारात आहेत. वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. धारणकर तपास करीत आहेत.