
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पिंपळगाव मोर सोसायटीचे माजी चेअरमन पंढरीनाथ काळे यांची निर्दोष ठरवण्यात आले आहे. डिसेंबर २०२० मध्ये इगतपुरी पोलीस ठाण्यात तत्कालीन सहकार अधिकारी अनिल रामसिंग पाटील यांनी पंढरीनाथ काळे यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहितेचे कलम ३५३, ५०४ व ५०६ अन्वये फिर्याद दाखल केली होती. सविस्तर असे की पिंपळगाव सोसायटीचे तत्कालीन चेअरमन पंढरीनाथ काळे सोसायटीच्या कार्यालयीन कामकाजानिमित्त सहाय्यक निबंधक कार्यालय इगतपुरी येथे १ डिसेंबर २०२० ला दुपारी गेले होते. श्री. काळे यांनी श्री. पाटील ह्यांना सोसायटीच्या तक्रार अर्जाच्या सुनावणीबाबत विचारले. यावेळी श्री. काळे यांनी रागावून टेबलावरील फाईल खाली फेकून कागदपत्र अस्ताव्यस्त केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता. इगतपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. डी. पाटील यांनी तपासकार्य केले होते. त्यावेळी पंढरीनाथ काळे यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता. सुनावणी दरम्यान सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे, नितु शिंदे, योगेश खरात आदींची साक्षीदार म्हणून साक्ष घेण्यात आली. फिर्यादी अनिल रामसिंग पाटील यांना श्री. काळे यांच्याविरोधातील सरकारी कामात अडथळा आणणे, अर्वाच्य भाषेत बोलणे अथवा जीवितास धोका पोहोचवणे आदी आरोप सिद्ध करता आले नाही. त्यानुसार पंढरीनाथ काळे यांना अतिरिक्त सत्र न्यायाधिशांनी १३ फेब्रुवारी २०२५ ला निर्दोष ठरवले. २०१५ मधील निवडणूकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती झालेली होती. निवडून आल्यानंतर पंढरीनाथ काळे यांनी अनामत रकमेची मागणी केली असता श्री. पाटील यांनी अनामत रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे काळे यांनी पाटील यांची वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून पाटील यांनी काळे यांचेवर खोटी फिर्याद दाखल केली असल्याचे पंढरीनाथ काळे यांनी सांगितले. सरकारतर्फे ॲड. शिरीष कडवे यांनी तर पंढरीनाथ काळे यांच्यातर्फे ॲड. झेड. एच. इनामदार व ॲड. रवींद्र गीते यांनी काम पाहिले.