
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – आज पहाटेच्या वेळी मुकणे कॉलनी परिसरात उपसरपंच भास्कर राव यांच्या घराजवळील पडवीतील वासरावर बिबट्याने हल्ला चढवीत ठार केले आहे.बिबट्यांचा मानवी वस्तीत शिरकाव वाढला आहे. अनेकदा मागणी करुनही साधा पिंजरा लावण्याचीही तसदी वनविभाग घेत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. थायसन, जिंदाल कंपनी येथे नेहमीच आवर्जुन पिंजरे लावले जातात मग कंपन्यांसाठी इतकी मेहेरबानी व लोकवस्तीकडे डोळेझाक का..? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. यापूर्वी शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला तेव्हा सोपस्कार म्हणुन लावलेल्या पिंजऱ्यात शेळीच ठेवली नाही. यामुळे बिबट्या फिरकलाही नसल्याचे आसपासच्या शेतकऱ्यांनी सांगितले. वनविभागाला बिबट्याच्या हल्ल्यात अजुन किती मानवी बळी घ्यायचे आहे असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. मुकणे येथील बिबट्या पकडण्यासाठी तात्काळ पिंजरा लावुन त्यात शेळी ठेवण्याचीही व्यवस्था करावी अन्यथा ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव, ग्रामपंचायत सदस्य मोहन बोराडे, गणेश राव, निवृती आवारी, ज्ञानेश्वर राव, सोसायटी संचालक गणेश राव, गजीराम राव, रामभाऊ राव आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे.
