

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अधुन-मधुन बरसणाऱ्या जोरदार गारांच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी आधीच सावरलेला नाही. त्यात दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे पुनःश्च मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी व बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांच्या टोमॅटो, कांदे, मिरची, फ्लॉवर, कोबी, भोपळा, वांगे आदी बागायती पिकांसह गहु, जनावरांचा चारा यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचेही पंचनामे झाले नाही. पुन्हा जोरदार पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यंदा सुरवातीपासूनच एकाही बागायती पिकाला भाव नाही. त्यातच महागडे औषधे, खते, मजुर यावर मोठ्या प्रमाणात खर्च करून जगवलेल्या पिकांची अवकाळी पावसाने पुरती नासाडी झाली. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकांचे तसेच वीटभट्टी व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचे शासनाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी घोटी बाजार समितीचे संचालक तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव आणि खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष जयराम धांडे यांनी केली आहे.

