चंद्रकांत जगदाळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
जनम जनम जनम साथ चलना युहीं …
कसम तुम्हे कसम आके मिलना यहीं… हे अर्जित सिंग यांनी गायलेलं गीत जालिंदर सापनर आणि सारिका रणपिसे यांच्यासाठीच गायलेलं असावं असं वाटावं…अशी या दोघांची प्रेम कहाणी आहे. जन्मतः दिव्यांग, त्यात चालणे मुश्किल, अशा वेळी शिक्षणाची जिद्द, शिक्षण घेतेवेळी जोडीदाराची भेट..त्यातून मैत्री, प्रेम आणि लग्न असा घटनाक्रम असलेला विवाह उजनी ( ता. सिन्नर ) येथे नुकताच पार पडला. या विवाहाची चर्चा जिल्हाभर सुरु आहे.
सिन्नर तालुक्यातील उजनी येथील शेळीपालन व्यावसायिक सुखदेव सापनर यांना जालिंदर, मच्छिंद्र आणि गोरख ही तीनही जन्मतः दिव्यांग मुले. घरची परिस्थिती देखील बेताची. त्यातील जालिंदर हा मोठा मुलगा. जालिंदर शरीराने दिव्यांग असला तरी मनाने पहाडाइतका कठीण आहे. त्याला शिक्षणाची उर्मी स्वस्थ बसू देईना. गाडीने सोडविता येईल इतकीही घरची परिस्थिती नसल्याने पठ्या थांबला नाही. पायाची चप्पल हातात घालून सरपटत जाऊन तो शिक्षण घेत होता. अपंग शाळेत शिकत असतांना त्याची ओळख खेड तालुक्यातील वापगाव येथील सारिका रणपिसे या विद्यार्थिनीसोबत ओळख झाली. सारिका देखील जन्मतः दिव्यांग आहेत. दिव्यांग असले तरी मनाने खंबीर असल्याने दोघांनाही शिक्षणाची वाट धरली, हा त्यांच्या मैत्रीतील समान धागा आहे. दिव्यांग असूनही शिक्षणाच्या जिद्दीची ज्योत दोघांनी तेवत ठेवली. सोबत शिकता शिकता मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ही गोष्ट प्रेमकहाणी पुरतीच मर्यादित न राहता विवाह वेदीवर हातांत हात घेऊन आजन्म साथ निभाविण्यापर्यंत पोहचली.
तीस जूनला दोघांनी कोर्टात नोंदणीकृत पद्धतीने लग्न केले. दोघांचीही आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मंगळवारी साध्या पद्धतीने त्यांनी लग्न केले. या लग्नासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तु बोडके , जिल्हा चिटणीस समाधान बागल, नाशिक शहरप्रमुख शाम गोसावी, सिन्नर तालुका प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे अरुण पाचोरकर उपस्थित होते. या विवाहाची जिल्हाभर चर्चा होत आहे.