शेतकऱ्यांचे दुर्दैव : पावसाच्या हुलकावणीने टँकरच्या पाण्याद्वारे भाताची लावणी

किशोर देहाडे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

पावसाचे माहेरघर, महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात पावसाच्या हुलकावणीने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. लावणीला आलेली भाताची रोपे जमिनीत लावणी करण्यासाठी टँकरने पाणी मागवले जात आहे. त्यामुळे भाताच्या उत्पादन खर्चात वृद्धी झाली आहे. असे असूनही भाताला भाव मिळेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. पावसाचा बेभरवशी कारभार भातासाठी कर्दनकाळ होण्याची भीती वाढली आहे.

१ जूनच्या पावसामुळे शेत नांगरणी, भात बियाणे पेरणीच्या कामांना सुरुवात झालेली होती. त्यामुळे लावणीला आलेली रोपे वेळेत तयार झाली परंतु पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. आवनी अर्थात लागवडीसाठी तयार झाली असूनही पाऊस नसल्याने आवनी कशी करावी हा मोठा बिकट प्रश्न शेतकऱ्यांना पडला. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी बाहेरून टँकरद्वारे पाणी विकत आणून आपल्या शेतात भात लागवड सुरू केली आहे. टँकरच्या पाण्याचा खर्च आणि मजुरांची वाढती मजुरी देऊन भाताची आवणी सुरू आहे. उधार उसनवाऱ्या करून अतिरिक्त खर्च भागवला जात असला तरी घरी शेतकरी लागवडीसाठी आभाळाकडे डोळे लावून वाट पाहत आहे. दुबार पेरणीच्या संकटाने शेतकऱ्यांचे अर्थचक्र सुद्धा धोक्यात आले आहे.

टँकरद्वारे शेतात पाणी देण्याचा व्हिडिओ बघा

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!