इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ – मुंबई आग्रा महामार्गालगत केपीजी महाविद्यालयाजवळ असलेल्या ओव्हर ब्रिजखाली रात्रीच्या वेळेस वाहन चालक वाहन बाजुला लावुन विश्रांती घेत असतांना त्यांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवुन लुटमार करणाऱ्या सहा संशयित आरोपींना इगतपुरी पोलीसांनी धारदार शस्त्रासह अटक केली आहे. रात्रीच्या वेळेस प्रवाशांची रोख रक्कम आणि दागिने लुटणारी ही टोळी अनेक महिन्यापासुन कार्यरत असल्याची चर्चा होती. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना गुप्त माहितीच्या आधारे माहिती मिळताच त्यांनी ग्रामीण पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे व पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तैनात करून सापळा रचला. सोमवारी रात्री वाहनधारकांना शस्त्रांचा धाक दाखवुन लुटमार करण्याच्या तयारीत असलेली टोळी पैकी एका संशयिताला पोलिसांनी रंगेहात पकडले. यावेळी त्याच्याकडे एक कोयता, तलवार व धारदार शस्त्रे मिळुन आली. पोलीसांचा सुगावा लागताच बाकी टोळके जंगल भागात पळुन गेले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच पळालेल्या सर्व संशयित आरोपींचा मोबाईल नंबर, नावे, फोटो व माहिती मिळताच पोलीसांनी मंगळवारी उर्वरीत पाच संशयित आरोपींना जेरबंद केले. पोलीस हवालदार सचिन देसले यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या विरूध्द लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे किंवा मदत केंद्र कुठे आहे याची माहिती नसल्याने अनेक वाहन चालक व प्रवासी घटना झाल्यावर निघुन जातात. याचाच फायदा घेत या टोळक्याने अनेक महिन्यापासुन लुटमारी, दरोडा या सारख्या कामाला व्यवसाय व उत्पन्नाचे साधन केले होते. मात्र इगतपुरी पोलीस ठाण्यात नव्याने कार्यक्षम अधिकारी म्हणुन पोलीसी खाक्या दाखविणारे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांची नियुक्ती झाल्याने शहर व परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. अनेक गुन्ह्यांची उकल करून कायदा व सुव्यवस्था राखल्याने नागरिक सहकार्य करीत आहेत. नागरिक पोलीस मित्र झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जेरबंद केलेल्या टोळीत संशयीत अल्पवयीन आरोपी असून सर्वजन गिरणारे येथील आहेत. कसारा घाट ते टाके घोटी हद्धीत महामार्ग व परिसरात होणारी लुटमार, दरोडा आदी गुन्ह्यातील आणखी काही गुन्हेगार मिळुन येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, सचिन देसले, मुकेश महिरे, विजय रूद्रे, निलेश देवराज, अभिजित पोटींदे, आबासाहेब भगरे, सचिन मुकणे, एस. एस. जाधव, साळवे आदी तपास करीत आहेत.