इगतपुरीनामा न्यूज, दि. १० – इगतपुरीच्या पूर्व भागातील नांदगाव बुद्रुक, साकुर भागात रविवारी झालेल्या जोरदार गारांच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बागायती पिकांसह, ऊस, गहू, कांदा, मका, पॉलिहाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. याबाबत माहिती कळताच इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शंभर टक्के शेती उध्वस्त झाली असून, शासनाने तुटपुंजी भरपाई न देता ५० हजार रुपये एकरी नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनदरबारी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले. यावेळी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी अधिकाऱ्यांना कार्यवाहोच्या सूचना दिल्या. तालुका कृषि अधिकारी शितलकुमार तंवर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक वस्तुनिष्ठ पंचनामे करीत आहेत. साकुर येथे काल पडलेल्या गारांनी लावरी, खाचा, चिमणी या पक्षांचा मृत्यू झाला आहे.
सततच्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने झाडेही उन्मळून पडली. तर काही ठिकाणी विजेच्या तारा, पोल पडले आहेत. यावेळी आमदार खोसकर यांनी वीज वितरण कंपनीला सूचना दिल्या. काही ठिकाणी घरांचेही पत्रे उडाले आहेत. येथील भिल्ल आदिवासींच्या झोपड्या उध्वस्त झाल्या. टमाटे लागवड करण्यात आलेल्या मल्चिंग पेपर, तसेच काकडी, टमाटे यांना गारांनी चट्टे पडले आहे. सर्वांना तात्काळ शासकीय मदत मिळावी अशी मागणी वंचित आघाडीचे तालुका निरीक्षक दादाभाऊ शिरसाठ, माजी सरपंच भाऊसाहेब गायकर, सुनील गेणु पागेरे, विलास गेणू पागेरे, बाळू पांडुरंग गायकर, माजी चेअरमन बन्सी पागेरे, नारायण गायकर, किरण पागेरे, संदीप पागेरे, नाना गायकर, बाळू गायकर, रामदास गायकर, रोहिदास गायकर, प्रताप भोर, भानुदास मांडे आदींनी केली आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, चेअरमन विष्णुपंत सहाणे, मधुकर सहाणे, सरपंच विनोद आवारी, उपसरपंच विष्णुपंत सहाणे, पोलीस पाटील शिवाजीराव सहाणे, जगनराव सहाणे, मनोज सहाणे, बाळासाहेब कुकडे, दिलीप गावंडे आदी उपस्थित होते.