वारकऱ्यांचे लाडके वै. शत्रुघ्न महाराज गतीर – इगतपुरी तालुक्यातील अनमोल रत्न पांडुरंगचरणी विलीन

लेखन – भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा

पवित्र ते कुळ पावन तो देश
जेथे हरिचे दास जन्म घेती
असे सर्वच संतांचे सिद्ध झालेले प्रमाण आहे. ह्यानुसार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका सुद्धा मागे नाही. ह्या तालुक्यात विविध रत्नांची खाण आहे. ह्यापैकी अत्यंत महत्वाचे अनमोल असणारे एक रत्न हभप शत्रुघ्न महाराज महादु गतीर हे १ एप्रिल २०२३ ला वैकुंठवासी झाले. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात परमार्थमार्गाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे त्यांचे अलौकिक व्रत त्यांच्या जाण्याने थांबले आहे. शेकडो युवकांना व्यसनाच्या गर्तेतुन बाहेर काढत असतांना शुद्ध आचरण, शुद्ध पारमार्थिक जीवन कसे जगायचे याचे धडे आता आपल्याला मिळणार नाहीत. जो सर्वांना आवडतो तो परमेश्वराला सुद्धा आवडतो. ते ह्या जगात नाहीत हे बाह्य जगताला मान्य होत नाही. तथापि त्यांच्या कार्याचा दरवळ, त्यांनी उभे केलेले कार्य, घडवलेले निर्मळ वारकरी यांच्या माध्यमातून हभप शत्रुघ्न महाराज महादु गतीर हे चिरंतन आपल्यातच असल्याची प्रचिती आपल्याला देतील. शत्रुघ्न महाराजांचे ध्येयवादी व्रत, स्वप्न, परमार्थ मार्गाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यापुढे गतीर परिवारावर जबाबदारी आली आहे. ह्या माध्यमातून शत्रुघ्न महाराज आपल्यातच असल्याचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही.

इगतपुरी तालुक्यातील वारकरी सांप्रदायिक आदर्श शेतकरी असणाऱ्या गतीर परिवारात २ जुन १९६९ ह्या दिवशी शत्रुघ्न महाराजांचा जन्म झाला. आई कचराबाई, वडील महादु यांच्या सुसंस्कारी व्रतस्थ जीवनाचा अंगीकार त्यांच्या अंगी शेवटपर्यंत भिनलेला होता. १२ वी पर्यंतचे शिक्षण घेऊन संत साहित्याचा दांडगा अभ्यास असतांना गायन, कीर्तन, प्रवचन, हार्मोनियम आदी कला त्यांनी आत्मसात केल्या. बालपणापासून बालकांमध्ये परमार्थाची आवड निर्मित व्हावी म्हणून त्यांनी उत्तम प्रकारे वारकरी परंपरेचा प्रचार केला. भाऊ मनोहर, धनंजय, मारुती, राम, लक्ष्मण, भरत, रंधव ( कृष्ण ), बहीण रत्नाबाई, पत्नी विमलबाई, मुले हरिदास, उद्धव. मुली राधिका, द्वारका आदींचे सहाय्य आणि पाठिंबा यामुळे काम उभे करू शकलो असे ते विविध ठिकाणी आवर्जून सांगत. महाराष्ट्रातील अनेक गावांच्या सप्ताहात २५ वर्षांपासून सलग आठही दिवस उपस्थित राहून काकडा भजन, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन या सर्व कार्यक्रमात ते सक्रिय सहभाग घेत असत. अनेक लोक एकाच गावात २ ते ३ वर्ष राहतात परंतु शत्रूघ्न महाराज अनेक गावांमध्ये २५ ते ३० वर्षांपासून सेवा देत होते हे विशेष म्हणावे लागेल. १९८४ साली मुंढेगाव येथील घरासमोर राज्यभर प्रसिद्ध असणारा अखंड हरिनाम सप्ताह त्यांच्या मार्गदर्शनाने सुरु झालेला आहे. १९९७ मध्ये घरासमोर विठ्ठल रुख्मिणी मंदिर बांधले. त्यांच्या कार्याचा मापदंड आकाशापेक्षा व्यापक आहे. त्या कार्याचा थोडक्यात आढावा घेणे अतिशय अवघड बाब आहे. त्यांच्या कार्याच्या रूपाने त्यांचे संतत्व कायम आपल्या सर्वांच्या सोबत असेल. दशक्रिया विधीचा कार्यक्रम मुंढेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक येथे सोमवारी १० एप्रिल २०२३ ला होणार आहे.

स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स

इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा

संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps

Similar Posts

error: Content is protected !!