इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
नाशिक येथील पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक मातोश्री पार्वतीबाई गोसावी यांच्या ४४ व्या स्मृतिदिनानिमित्त PSSP-nashik या युट्यूब चॅनलवर ऑनलाईन पद्धतीने पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रा. लक्ष्मीकांत जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत व संस्थेचा परिचय करून दिला. याप्रसंगी संस्थेचे प्रधान विश्वत डॉ. मो. स. गोसावी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात डॉ. गोसावी म्हणाले की, ज्ञानाबरोबर ज्यांनी समाजात सात्विकता व सामाजिकता निर्माण केली अशांचा गौरव होणे गरजेचे आहे. शिक्षण हे जास्तीत जास्त संजीवक झाले पाहिजे. ज्ञान आणि कौटुंबिकता ही भारताने जगाला दिलेली खूप मोठी देणगी आहे.
यानंतर पुण्यश्लोक सद्गुरु शिव पार्वती आध्यात्मिक पुरस्कार प. पू. दत्तदास महाराज, दत्त धाम संस्थान नाशिक यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेने दिलेल्या पुरस्काराने आपण आनंदीत झाल्याचे त्यांनी सांगितले. श्रीराम पराडकर वैदिक पुरस्कार वे. शा. सं. बाळकृष्ण हरी आंबेकर अग्निहोत्र महाराज नाशिक अशी ओळख असणाऱ्या श्री. आंबेकरांना अत्यंत सन्मानपूर्वक रीतीने प्रदान करण्यात आला. नंदलाल जोशी वेद वेदांग पुरस्काराने पंकज उंदीरवाडकर यांना गौरविण्यात आले. डॉ. मो. स. गोसावी लोकसेवक पुरस्कार नाशिक येथील प्रख्यात विधिज्ञ ॲड. जयंतराव जायभावे नाशिक यांना त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वर्षापासून सुरू करण्यात आलेला डॉ. सुनंदा गोसावी संगीतरत्न पुरस्कार पं. डॉ. अविराज तायडे यांना अत्यंत सन्मानपूर्वक देण्यात आला. आदर्श संस्था म्हणून संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार करणाऱ्या नाशिक येथील संस्कृत भाषा सभा संस्थेला गौरविण्यात आले. वैदेही सर्जशीलता पुरस्काराने संगीत क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या मनिषा विवेक महाजन यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले. तर प्रज्ञावंत म्हणून आदिवासी भागात कृषी क्षेत्रासाठी काम करणाऱ्या रूपाली देशमुख यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सेवाव्रती अनुबंधी पाच दांपत्यांचा सत्कार करण्यात आला. यात सौ. तारा व डॉ. उल्हास रत्नपारखी, डॉ. रश्मी व डॉ. मनोज चोपडा, सौ. सुचेता व निशिकांत अहिरे, सौ. सुशिला व डॉ. एस. आर. खंडेलवाल आणि ॲड. सोनाली व ॲड. विश्वनाथ टाळकुटे या अनुबंधी दांपत्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी संपादित केलेल्या व वि. वा. लक्ष्मीकांत जोशी यांनी लिहिलेल्या शिवज्योती ह्या मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्याच्या अध्यक्षा प. पू. स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनी आपल्या आशीर्वादपर भाषणात सांगितले की , गेले ४३ वर्षे अखंडपणे कार्य सुरू ठेवणाऱ्या या संस्थेचे खरचं कौतूक केले पाहिजे. ही संस्था विविध उपक्रमांच्या द्वारे समाजाला चांगला विचार देण्याचे काम करत आहे. करोनाच्या काळात हे कार्य चालू ठेवणे ही फार मोठी गोष्ट आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गान सम्राज्ञी लता मंगेशकर व एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्या कै. डॉ. सुनंदाताई गोसावी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. गोसावी कुटुंबीयांच्या वतीने कल्पेश गोसावी यांनी आपल्या मातोश्रीवर लिहिलेल्या कवितेचे वाचन केले. मनीषा बागूल यांनी ईशस्तवन सादर केले. रुचिरा गोसावी व शैलेश गोसावी यांनी अनुबंधी दाम्पत्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वआभार प्रा. लक्ष्मीकांत जोशी यांनी केले. या कार्यक्रमाचा आस्वाद सर्व दुरवरच्या रसिक श्रोत्यांनी ऑनलाईन पध्दतीने घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.