कुपोषण निर्मूलन मोहीम – तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे इगतपुरी तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी उपयुक्त परसबाग किट वाटप : योजनेचा लाभ घेण्याचे तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

महाराष्ट्र शासनाच्या कुपोषण निर्मूलन मोहिमेअंतर्गत इगतपुरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे तालुक्यातील कुपोषित बालकांच्या पालकांना परसबाग किटचे वाटप करण्यात आले. वाटप करण्यात आलेल्या परसबाग मिनीकिटमध्ये वाटाणा, शिरी दोडका, भेंडी, चवळी, घेवडा, मेथी, पालक, मुळा, चोपडा दोडका या भाजीपाला बियाण्यांचा समावेश आहे. कुपोषित बालकांच्या पालकांनी आपल्या शेतात किंवा घराशेजारील मोकळ्या जागेत, परसबागेत या बियाणांची लागवड करावी. त्यामुळे आपल्या पाल्यांना सकस व पूरक अन्न पुरवठा व्हावा हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. त्यादृष्टीने परसबाग किटला महत्त्व आहे. तालुका कृषी विभागाच्या या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शीतल कुमार तंवर यांनी केले आहे.

इगतपुरी तालुक्यातील धामणगाव, खेड भैर, परदेशवाडी रायांबे, कऱ्होळे, काळूस्ते, कुशेगाव, धारगाव, शेवगेडांग, मांजरगाव, आंबेवाडी, खडकेद, इंदोरे, बारशिंगवे आदी गावांमध्ये या मिनी किटचे वाटप करण्यात आलेले आहे. याच मोहीम अंतर्गत भरवज आणि निरपन येथे मिनी किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक किशोर भरते यांनी परसबागेचे महत्व आणि लागवडीविषयी माहिती दिली. यावेळी भरवजचे माजी ग्रामपंचायत सदस्य सदाशिव हनुमंत साळवे, राजेंद्र विठ्ठल घारे, सामाजिक कार्यकर्ते कैलास गणपत घारे, कुपोषित बालक जयेश रामदास घारे, अनुसयाबाई सदाशिव घारे, मंजुळाबाई काशिनाथ घारे, निरपनचे माजी सरपंच प्रकाश संतु भले, ग्रामपंचायत सदस्य धोंड्याबाई वाळु भले, कुपोषित बालक अखिल आकाश भले, कृषी सहाय्यक मोहिनी चावरा, प्रियंका पांडूले आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!