
इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – वारकरी संप्रदाय सोडून कोणत्याही पंथात काला केला जात नाही. मानवी प्रतिष्ठा म्हणजे काला प्रसाद आहे. कृष्ण चरित्र सांगून काल्याची परंपरा जोपासली जाते. काला प्रसाद क्लेशापासून मुक्तता करतो. पाप ग्रह, क्रूर ग्रह, दृष्ट ग्रह, अघोर शक्तीपासून समाजाला सामर्थ्य बल मिळते. भगवान श्रीकृष्ण यांचे चरित्र कथन करणे म्हणजे काला असे महत्वपूर्ण निरूपण संत वाङमय व भारतीय तत्वज्ञानाचे थोर अभ्यासक जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांनी केले. लोहशिंगवे येथे दोन दशकापासून ग्रामस्थांनी हरिनाम सप्ताहाची परंपरा टिकून ठेवली आहे. ह्या अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाच्या सांगतेप्रसंगी डॉ. रामकृष्णदास लहवितकर बोलत होते. सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन देवाचा प्रसाद मोठ्या आदराने सेवन करतात. यामुळे आध्यात्मिक समता निर्माण होऊन सामाजिक विषमता दूर होते. लोक एकत्र येऊन गावाच्या विकासाचा विषय घेतात ही अतिशय चांगली बाब असून ती वारकरी संप्रदायाने जोपासली आहे. यावेळी विठू नामाच्या जयघोषात गावातून वारकऱ्यांची दिंडी काढून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.